विद्युत रोहित्र निकामी झाल्याने वेकोली कामगार अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:19 AM2021-07-09T04:19:03+5:302021-07-09T04:19:03+5:30
माजरी : भद्रावती तालुक्यातील वेकोली माजरी क्षेत्रांतर्गत असलेल्या माजरी या गावात गेल्या तीन दिवसांपासून वेकोलीच्या विद्युत विभागाच्या ३३ ...
माजरी : भद्रावती तालुक्यातील वेकोली माजरी क्षेत्रांतर्गत असलेल्या माजरी या गावात गेल्या तीन दिवसांपासून वेकोलीच्या विद्युत विभागाच्या ३३ के.व्ही. सबस्टेशनमधील रोहित्रामध्ये बिघाड झाल्याने माजरी, कुचना, चारगाव, तेलावसा व ढोरवासा या वेकोलीच्या वसाहतीतील विद्युतपुरवठा खंडित झालेला आहे. विद्युतपुरवठा खंडित झाल्याने नळाचे पिण्याचे पाणी बंद आहे. पुन्हा दोन दिवस वीज, पाणी मिळणार नाही. विद्युत रोहित्र तीन दिवसांपासून निकामी झाल्यामुळे वेकोलीच्या वसाहतीतील अंधार दाटला असून नागरिकांना काळोखात दिवस काढावे लागत आहेत.
याबाबत वेकोलीच्या कामगारांनी विद्युत विभागाला कळविले असता अजूनही दखल न घेतल्याने वेकोली कामगारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. यापूर्वी वेकोलीच्या विद्युत विभागाकडून ६६ के.व्ही.चे रोहित्र वापरण्यात येत होते. मात्र, काही दिवसांपूर्वी ६६ के.व्ही.चे रोहित्र बदलून ३३ के.व्ही.चे रोहित्र लावण्यात आले. दरम्यान, ३३ के.व्ही.चे रोहित्र निकामी झाल्याने वीजपुरवठा खंडित आहे. त्यामुळे पाणीपुरवठा, उत्पादन, कार्यालयीन व अन्य महत्त्वपूर्ण कामे प्रभावित झाली आहे.
महावितरणकडून दुरुस्ती कामासाठी वीजपुरवठा बंद राहणार असेल, तर तसे ग्राहकांना आधी एक-दोन दिवस मोबाइलवर ''एसएमएस''द्वारे कळवले जाते. मात्र, वेकोलीचे रोहित्र बदलण्याचे काम सुरू असल्याने तसेच पाटाळा-नागलोन या मार्गावर विद्युतखांबावर विद्युततार टाकत असल्याने वीजपुरवठा बंद केला आहे. परंतु, वीजपुरवठा बंद राहणार असल्याबाबतची वेकोली प्रशासनाकडून कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक वीजपुरवठा खंडित केल्याने वेकोली कामगार संतप्त झाले आहे. वेकोली प्रशासनाच्या चुकीमुळे वेकोली कामगारांचे जनजीवन प्रभावित झाले आहे. तांत्रिक कारणे न सांगता वेकोलीने लवकरात लवकर विद्युतपुरवठा पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी होत आहे.
कोट
रोहित्र बंद पडल्याने वीजपुरवठा खंडित झालेला आहे. तोेेे सुरू हाेण्यासाठी दोन दिवस लागतील. काम सुरू आहे.
-लोकेश मालव, अभियंता, विद्युत विभाग, वेकोली माजरी क्षेत्र