चंद्रपूरच्या ईरई व झरपटच्या विद्रुपीकरणाला वेकोलिच जबाबदार
By राजेश भोजेकर | Published: June 15, 2024 06:26 PM2024-06-15T18:26:29+5:302024-06-15T18:27:29+5:30
जिल्हाधिकाऱ्यांचे नागपूर खंडपीठात अखेर शपथपतत्र; नरेश पुगलिया यांची माहिती
चंद्रपूर : चंद्रपूरच्या जीवनदायिनी ईरई व झरपट नद्यांच्या विद्रुपीकरणाचा मुद्दा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात चांगलाच गाजत आहे. नागपूर खंडपीठाच्या आदेशावरून प्रतिवादी चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांनी अखेर आपले अभ्यासपूर्ण शपथपत्र न्यायालयात दाखल केलेले आहे. यामध्ये ईरई व झरपट नदीच्या विद्रुपीकरणास सर्वस्वी वेकोलिच कारणीभूत असल्याचे म्हटले आहे, अशी माहिती जनहित याचिकाकर्ते माजी खासदार नरेश पुगलिया यांनी शनिवारी येथे दिली.
पद्मापूर वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड खाणीची पातळी ही ईरई नदीच्या बरोबरीने असल्याने त्यातील वाळूमिश्रित माती व गाळ ईरई नदीच्या पात्रात येत आहे. यामुळे नदीचे रूपांतर नाल्यात होत आहे. भटाळी खाणीमध्ये कोळशाची साठवणूक करतात. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पाणी मारणे थांबविले. परिणामी वायू प्रदूषणात वाढ झाली आहे. हिंदुस्थान लालपेठ खाणीमुळे ईरई नदीचे पात्र उथळ झाले असून, पावसाळ्यात चंद्रपूर शहरातील पाण्याचा प्रवाह सरळ हाेत नाही. तसेच पद्मापूरपासून लालपेठ खाण ते दुर्गापूरपर्यंत तयार झालेले वेकोलिचे ढिगारे हटविले नाही. यामुळे ही माती थेट नद्यांमध्ये जाते, ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या लेखी उत्तरातून स्पष्ट झाली आहे. यामुळे वेकोलि आता हात वर करू शकत नाही. ईरई नदीतून अर्ध्या शहराला पिण्याचे पाणी मिळते. काठावरील विचोळा, छोटा नागपूर, पडोली, कोसारा, दाताळा व इतर गावांच्या पिण्याच्या पाण्याची नळयोजना आहे. जेव्हा अतिवृष्टी होते तेव्हा त्याचा फटका पुराच्या रूपाने चंद्रपूर शहराला बसतो. ही बाब अधोरेखित झाली आहे, याकडे नरेश पुगलिया यांनी लक्ष वेधले आहे.
कायमस्वरूपी उपयायोजना करण्याची गरज
ईरई व झरपट नदीवर बंधारा बांधण्याची गरज आहे. दोन्ही नद्यांचे खोलीकरण व्हावे. ईरई नदीवर डाव्या व उजव्या तीरावर संरक्षक भिंत व इतर विकासाची कामे करणे आवश्यक आहे. या दोन्ही नद्यांच्या खोलीकरणाची जबाबदारी वेकोलिवर सोपविण्यात यावी. संरक्षण भिंत व इतर विकासांसाठी लागणारा निधी राज्य शासन देत नसेल तर जिल्हा खनिज विकास निधीतून ही कामे करावी, असेही पुगलिया यांनी म्हटले आहे.
जनआंदोलन उभारण्याची इशारा
पालकमंत्र्यांनी पुढाकार घेऊन या नद्यांचा प्रश्न मार्गी लावाला. नागपुरात उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे जनआंदोलन उभे झाले होते. या धर्तीवर चंद्रपुरातील ईरई व झरपट नदीला प्रदूषण व पूरमुक्त करण्यासाठी येथील जनता जनआंदोलन करेल, असा इशाराही पुगलिया यांनी यावेळी दिला.