कोरपना तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखाने ऑक्सिजनवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:31 AM2021-08-24T04:31:54+5:302021-08-24T04:31:54+5:30
नांदा फाटा : कोरपना तालुक्यातील कोरपना, वडगाव, गडचांदूर या तीन पशुवैद्यकीय दवाखान्यांतील महत्त्वाची पदे रिक्त असल्याने हे पशुवैद्यकीय ...
नांदा फाटा : कोरपना तालुक्यातील कोरपना, वडगाव, गडचांदूर या तीन पशुवैद्यकीय दवाखान्यांतील महत्त्वाची पदे रिक्त असल्याने हे पशुवैद्यकीय दवाखाने ऑक्सिजनवर असल्याचे दिसून येत आहे. परिणामी दवाखान्यांत जनावरांना घेऊन जाणाऱ्या पशुपालकांना गेल्यापावली परत यावे लागत आहे.
कोरपना तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेती व्यवसाय केला जातो. पशुपालकांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. तालुक्यातील आवारपूर, अंतरगाव, कवठाळा, पिपडा, मांडवा, कोठोडा, पारडी, नारंडा येथे पशुवैद्यकीय दवाखाना आहे. यापैकी अंतरगाव येथील पशुधन पर्यवेक्षकांचे पद रिक्त आहे. गडचांदूर, वडगाव कोरपना या पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये उपचारासाठी अनेक शेतकरी जनावरांना घेऊन जातात. मात्र कधी औषधसाठा नाही, तर कधी डॉक्टर नसल्याची ओरड पशुपालकांकडून होत असते. तालुक्यात अनेक ठिकाणी काही शेतकऱ्यांनी दूध डेअरी उभारल्या आहेत. त्यामुळे पशुपालकांना जनावरांसाठी उपचारांची गरज पडते. परंतु, वेळेवर पशुधन वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडताना दिसून येते. दुधाळ जनावरांसह पाळीव कुत्री, शेळीपालन, कुक्कुटपालन करणाऱ्यांनाही उपचारासाठी शहरात जावे लागते. त्यामुळे वेळ व पैसा व्यर्थ जातो.
बॉक्स
जिवती तालुक्यातीलही पदे रिक्त
जिवती तालुक्याच्या स्थापनेपासून पशुधन विस्तार अधिकाऱ्याचे पद रिक्त आहे. या पदाला अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे त्वरित पशुवैद्यकीय अधिकारी व पशुविस्तार अधिकाऱ्याची पदे मंजूर करून पद भरती करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
बॉक्स
चार महिन्यांपासून चौखुराची लसच नाही
जनावरांमध्ये चौखुराची साथ दिसून येत आहे. यासाठी शासनामार्फत पशुवैद्यकीय दवाखान्यात लस उपलब्ध करून दिली जाते. मात्र कोरपना जिवती तालुक्यात मागील चार महिन्यांपासून ही लस उपलब्ध नसल्याची माहिती आहे. यामुळे बऱ्याच जनावरांचे लसीकरण केलेले नसून चौखुराची साथ बळावण्याचा धोका निर्माण झाला आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत ही लस दरवर्षी पुरवली जात होती. परंतु, यंदा विलंब होत असल्याने जनावरांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.