पशुवैद्यकीय दवाखाने आॅक्सिजनवर

By admin | Published: May 11, 2014 11:23 PM2014-05-11T23:23:23+5:302014-05-11T23:23:23+5:30

शासनाने शेतकर्‍यांना जे आधार दिले आहेत, ते शासकीय यंत्रणेनेच हिरावले आहे. शेतकर्‍यांना जनावरांवर उपचार करता यावा, यासाठी शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालय प्रत्येक तालुक्यातील गावांमध्ये दिसून येतात.

Veterinary clinics on oxygen | पशुवैद्यकीय दवाखाने आॅक्सिजनवर

पशुवैद्यकीय दवाखाने आॅक्सिजनवर

Next

रत्नाकर चटप - लखमापूर

शासनाने शेतकर्‍यांना जे आधार दिले आहेत, ते शासकीय यंत्रणेनेच हिरावले आहे. शेतकर्‍यांना जनावरांवर उपचार करता यावा, यासाठी शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालय प्रत्येक तालुक्यातील गावांमध्ये दिसून येतात. मात्र या रुग्णालयामध्ये औषधी उपलब्ध नसल्याने शेतकर्‍यांना जनावरांसाठी खासगी औषधालयातून औषधी खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. आधीच कर्जाचे ओझे डोक्यावर घेऊन जगणार्‍या शेतकर्‍यांना हा त्रास असह्य होत आहे. कोरपना तालुक्यातसह जिल्हाभरातील पशु वैद्यकीय दवाखाने सध्या आॅक्सिजनवरच असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी उपचारासाठी आलेले पशुवैद्यकीय अधिकारी औषधांची चिठ्ठी लिहून देतात. याबाबत त्यांना विचारणा केली असता दवाखान्यामध्ये पाहिजे तीे औषध उपलब्ध राहत नसून खासगीशिवाय पर्याय नसल्याचे ते सांगतात. परंतु यामुळे शेतकर्‍यांचे कंबरडे मोडत आहे. मुलाबाळांचे आजार, सोबतच जनावरांच्याही आजाराचा खर्च त्यांना आपल्याच खांद्यावर उचलावा लागत आहे. तालुक्यात गडचांदूर, आवारपूर, नारंडा, पारडी, कोरपना आदी औद्योगिक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी जनावरांना उपचारासाठी आणत असतात. परंतु औषधांच्या अपुर्‍या साठ्यामुळे त्यांना खासगी औषधालयाची वाट धरावी लागत आहे. शेतकर्‍यांनी शेतीसोबतच जोडधंदा म्हणून पशुपालन करावे असे सांगण्यात येते. त्यादृष्टीने शेतकरी जनावरे पाळतात. यात शेड्या, मेंढ्यासह गाई, म्हशी, बैल, कोंबड्या आदी प्रकारची जनावरे पाळून शेतकर्‍यांना जोडधंदा म्हणून आर्थिक लाभ मिळतो. यातच कधीकधी जनावरांना विविध आजार जङतात. त्यामुळे प्रसंगी जनावरांना जीवही गमवावा लागतो. अशा परिस्थितीत पशुवैद्यकीय रुग्णालय काठीचा आधार ठरेल, अशी शेतकर्‍यांची अपेक्षा असते. मात्र खासगी रुग्णालयासारखे पैसे उपचारासाठी मोजावे लागत असल्याने शेतकरी हैराण आहे. शासन शेतकर्‍यांना दुधाळ जनावरांचा व बैलजोडीचा पुरवठा सबसिडीच्या दरात करीत आहे. दुधाळू जनावरांच्या काही जातींना पोषक वातावरण व नियमित लसीकरणाची गरज आहे. परंतु लसीकरणासाठी लसीकरण उपलब्ध राहात नसल्याने काही वेळा खासगी दुकानातून औषधी खरेदी करावी लागत आहे. हीच परिस्थिती जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्येही दिसून येते. याबाबत प्रशासनाने दखल घेणे गरजेचे असून तात्काळ औषधांचा पुरवठा करण्यात यावा अशी मागणी शेतकरी करीत आहे. कोरपना तालुक्यात नऊ पशुवैद्यकीय रुग्णालये आजमितीस आहेत. यामध्ये गडचांदूर, आवारपूर, नारंडा, अंतरगाव, पारडी, कोठोडा, कोरपना, वडगाव, वनसडी या गावांमध्ये दवाखाने आहेत. मात्र वर्षभरात या रुग्णालयांमध्ये अत्यल्प औषधांचा पुरवठा होताना दिसतो. याउलट एका पशुवैद्यकीय अधिकार्‍यांना १० ते १५ गावांची जबाबदारी सांभाळावी लागत आहे. त्यामुळे जनावरांचे उपचार करताना हे अधिकारी अपयशी ठरतात. कोरपना येथे पशुवैद्यकीय विकास अधिकार्‍यांचे पद आजही रिक्त आहे.

Web Title: Veterinary clinics on oxygen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.