चंद्रपुरात डेंग्यूने घेतला शिक्षिकेचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 10:42 PM2018-11-02T22:42:37+5:302018-11-02T22:43:02+5:30
सेंट फ्रॉन्सिस स्कूलमधील शिक्षिका निक्की पाटील (३५) यांचा डेग्यूने शुक्रवारी सकाळी नागपूर येथे मृत्यू झाला. चंद्रपुरात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर डेंग्यूने नागरिकांचा बळी जात आहे. मात्र महानगरपालिकेचे यावरून लक्ष उडल्याचे दिसून येत आहे.
चंद्रपूर : सेंट फ्रॉन्सिस स्कूलमधील शिक्षिका निक्की पाटील (३५) यांचा डेग्यूने शुक्रवारी सकाळी नागपूर येथे मृत्यू झाला. चंद्रपुरात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर डेंग्यूने नागरिकांचा बळी जात आहे. मात्र महानगरपालिकेचे यावरून लक्ष उडल्याचे दिसून येत आहे.
शहरातील अन्नाभाऊ साठे चौक, बिनबा गेट परिसरातील रहिवासी निक्की पाटील या मागील दहा ते बारा दिवसांपासून आजारी होत्या. दरम्यान, चंद्रपुरातील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. प्रकृती खालावल्याने दोन दिवसांपूर्वी नागपुरातील धंतोली येथे खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. चंद्रपूरात मागील काही महिन्यांपासून डेंग्यूने थैमान घातले आहे.
आता महानगर पालिका रुबेला लसीकरणाच्या कामात व्यस्त झाल्याचे दिसून येत आहे. रूबेला लसीकरण महत्त्वाचे असले तरी सध्या चंद्रपुरात थैमान घालत असलेला डेंग्यू रोज नागरिकांचे बळी घेत आहे. याकडेही पालिकेने लक्ष देण्याची मागणी होत आहे. चंद्रपूर शहराचे स्वच्छतेत अग्रक्रम मिळविला होता. मात्र हे स्थान महानगर पालिका टिकवू शकली नाही. यामागे महानगर प्रशासन केवळ कामचालावू पद्धतीने वाटचाल करीत असल्याची कारणे चंद्रपूरकरांमध्ये चर्चिली जात आहे. डेंग्यू नियंत्रणात आणण्यासाठी मनपाने पुढाकार घेण्याची मागणी नागरिक करीत आहे.