पोलिस ठाण्याच्या आवारातच पीडित महिलेचे विष प्राशन, प्रशासनात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 11:04 AM2023-08-08T11:04:07+5:302023-08-08T11:06:03+5:30
आत्महत्येचा इशारा देऊनही पोलिसांचा कानाडोळा
वरोरा (चंद्रपूर) : अत्याचार करणाऱ्या आरोपींविरुद्ध तक्रार देऊनही अटक न केल्याने, पीडित आदिवासी महिलेने वरोरापोलिस ठाण्याच्या आवारातच विष प्राशन केल्याची खळबळजनक घटना सोमवारी (दि. ७) दुपारी ४:३०च्या सुमारास घडली. पीडितेला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या प्रकृती स्थिर असल्याचे समजते. आत्महत्येचा इशारा देऊनही पोलिसांनी कानाडोळा करण्याचे कारण काय, असा प्रश्न आता नागरिकांत विचारला जात आहे.
खांबाडा येथील महिलेने २ ऑगस्ट रोजी पोलिस अधीक्षकांकडे तक्रार दिली होती. त्या तक्रारीनुसार, शेख इरफान याने तिच्यावर अत्याचार केला. शेख इरफान व त्याचा भाऊ शेख रिजवान हे तक्रार परत घेण्यासाठी दबाव टाकत असल्याचे तक्रारीत नमूद केले. या प्रकरणाचा तपास वरोरा पोलिस ठाण्याचे एपीआय नीलेश चवरे करीत आहेत. दारूचा अवैध व्यवसाय करणारे आरोपीचे भाऊ शेख रिजवान याच्याशी चवरे यांचे आर्थिक संबंध असल्याने आपल्या तक्रारीची दखल घेतली नाही, असा आरोपही महिलेने केला.
आरोपीच्या नातेवाइकांनी खांबाळा येथील एका हॉटेलमध्ये बेदम मारहाण केली. तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला. मात्र, पोलिसांनी आरोपी शेख रिजवान, शेख मोहसीन, शेख दानिश व शेख मोहम्मद यांना अटक केली नाही. त्यामुळे आरोपींना अटक न झाल्यास ७ ऑगस्ट, २०२३ रोजी विष प्राशन करू, असा इशारा पीडित महिलेने गुरुवारी, ३ ऑगस्ट, २०२३ रोजी पत्रकार परिषदेत दिला होता. पोलिसांनी अटकेची कारवाई न केल्याचा आरोप करून महिलेने दुपारी वरोरा पोलिस ठाण्याच्या आवारातच विष प्राशन केले. हा प्रकार लक्षात येताच, पोलिसांनी तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर, जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले.
न्याय न मिळाल्यास विष प्राशन करू, असा इशारा देणाऱ्या महिलेला सोमवारी (दि. ७) वरोरा ठाण्यात बोलविले होते. ठाण्यात आल्यानंतर प्रकरणाची सर्व कायदेशीर बाबी त्यांना समजावून सांगितली. या प्रकरणातील चारपैकी तीन आरोपींना अटक झाली. तिघांना न्यायालयात हजर केल्याची माहितीही दिली, परंतु त्या ऐकण्याच्या स्थितीत नव्हत्या.
- आयुष नोपाणी, उपविभागीय पोलिस अधिकारी, वरोरा.