शैक्षणिक दुकानदारीने घेतला लोकेशचा बळी
By admin | Published: February 24, 2016 12:47 AM2016-02-24T00:47:07+5:302016-02-24T00:47:07+5:30
खासगी शैक्षणिक संस्थांकडून पैशासाठी विद्यार्थ्याचा कसा छळ केला जातो आणि त्यातून विद्यार्थी आत्महत्येसारखा मार्ग कसा अवलंबतात,...
रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार : महाविद्यालयाविरुद्ध कारवाईची मागणी
चंद्रपूर: खासगी शैक्षणिक संस्थांकडून पैशासाठी विद्यार्थ्याचा कसा छळ केला जातो आणि त्यातून विद्यार्थी आत्महत्येसारखा मार्ग कसा अवलंबतात, याचा प्रत्यय येथील लोकेश येरणे या विद्यार्थ्याच्या आत्महत्येच्या घटनेने आला आहे. लोकेशचा बळी खासगी शैक्षणिक दुकानदारीनेच घेतल्याच्या संतप्त प्रतिक्रीया येथे उमटत आहेत.
दरम्यान, याप्रकरणी येरणे कुटुंबीयाकडून नागपूर येथील जे.डी. अभियांत्रिकी महाविद्यालय प्रशासनाच्या विरोधात येथील रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवर आता पोलीस काय कारवाई करतात याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
लोकेश हा नागपूर येथील जे.डी. अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. त्याने तृतीय सत्राची परीक्षा व प्रात्यक्षिकासाठी अर्ज केला होता. मात्र महाविद्यालयाच्या प्रशासनाने त्याच्याकडे १ लाख २० हजार रुपये शुल्काची मागणी केली होती.
मात्र इतक्या तातडीने एवढी मोठी रक्कम भरण्याची लोकेशची आर्थिक परिस्थिती नसल्याने तो निराश झाला. त्याने महाविद्यालयाकडे मूळ कागदपत्रांचीही मागणी केली. मात्र शुल्क भरल्याशिवाय मूळ कागदपत्रेही देण्यास महाविद्यालय प्रशासनाने स्पष्ट नकार दिला होता. त्यामुळे लोकेशच्या मनावर परिणाम होऊन त्याने आत्महत्या केली, असे त्याच्या कुटुंबीयाकडून सांगण्यात आले.
मृत लोकशच्या वडिलांचा येथील सपना टॉकीज परिसरात पानटपरीचा व्यवसाय आहे, तर त्याची आई माया येरणे स्थानिक चांदा पब्लिक स्कूलमध्ये नोकरीला आहे. मोठा मुलगा शुभम हादेखील नागपूर येथे शिक्षण घेत आहे. लोकेशला एक बहीण आहे. (प्रतिनिधी)
ओबीसी कृती
समितीचे निवेदन
ओबीसी कृती समितीच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यायात जावून निवेदन देण्यात आले. यात लोकेशच्या मृत्यूमागे शुल्क भरण्याचे कारण असल्याने संबंधित महाविद्यालयावर आणि सामाजिक न्याय विभागावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे यावर काय कारवाई होते, याकडे लक्ष लागून आहे.