कर्जासाठी बळीराजाची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 10:54 PM2019-05-27T22:54:38+5:302019-05-27T22:54:49+5:30
सध्या एकीकडे लग्नसराई धडाक्यात सुरू आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना तोंडावर आलेल्या खरीप हंगामाची चिंता लागली आहे. मागील वर्षीची कर्जमाफी अनेकांना मिळाली नाही. प्रत्येक शेतकऱ्याला तत्काळ कर्ज देऊ, असे शासन सांगत असले तरी बहुतांश शेतकरी कर्जासाठी बँकाच्या चकरा मारीत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : सध्या एकीकडे लग्नसराई धडाक्यात सुरू आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना तोंडावर आलेल्या खरीप हंगामाची चिंता लागली आहे. मागील वर्षीची कर्जमाफी अनेकांना मिळाली नाही. प्रत्येक शेतकऱ्याला तत्काळ कर्ज देऊ, असे शासन सांगत असले तरी बहुतांश शेतकरी कर्जासाठी बँकाच्या चकरा मारीत आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यात छदामही नसल्याने त्यांची झोप उडाली आहे. नाईलाजाने शेतकरी सावकरांच्या दारात जात आहेत.
मागील वर्षीचा हंगाम शेतकऱ्यांसाठी अभिशाप ठरला. मोठ्या उत्साहाने पैशाची जुळवाजुळव करुन शेतकरी गतवर्षी खरीपासाठी उभा झाला. मात्र वरूणराजाने त्याचे कंबरडेच मोडले. मृग नक्षत्राला पाऊस पडला की जोमात पेरणी करायची, असा त्यांंचा मानस होता. मात्र पावसाने सातत्याने शेतकऱ्यांची निराशाच केली. पावसाने अनेकवेळा शेतकऱ्यांना दगा दिला. परिणामी शेतकऱ्यांना पिके वाचविताना मोठी कसरत करावी लागली होती. कशीबशी शेतकऱ्यांनी आपली पिके वाचविली. मात्र उत्पादनावर मोठा परिणाम झाला. पाहिजे तसे उत्पादन शेतकºयांच्या हाती आले नाही. दुसरीकडे शेतमालालाही भाव मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत लोटला गेला. लावलेला पैसाही निघाला नाही. त्यामुळे डोक्यावरील कर्ज तो फेडू शकला नाही. शासनाच्या कर्जमाफीचाही अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही. रबी हंगाम उलटून गेल्यानंतरही अनेक शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. आता शेतकरी पुन्हा खरीप हंगामाच्या कामाला लागला आहे. हंगामपूर्व मशागतीची कामे आता अंतिम टप्प्यात आली आहेत. मात्र हंगामासाठी शेतकºयांना पैसा हवा आहे. प्रत्येक शेतकऱ्याला कर्जाचे वाटप करा, असे निर्देश शासन दरवर्षी बँकांना देते. मात्र तसे होत नाही.
पुन्हा सावकारी पाश
खरीप हंगाम तोंडावर आला आहे. शेतकऱ्यांना बि-बियाणे, खते, मजूरवर्ग यासाठी पैैशाची गरज आहे. बँकाकडून अद्याप अनेक शेतकऱ्यांना कर्ज मिळाले नाही. हातात पैसा नाही. रबीनेही खिसा गरम केला नाही. त्यामुळे शेतकरी पुन्हा सावकाराच्या दारात उभे होत आहे. या संधीचा फायदा घेत अनेक अवैध सावकार सक्रिय झाले असून आपला पाश शेतकºयांच्या गळ्याभोवती आवळत आहेत.
बियाण्यांचा प्रश्न बिकट
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही, तळोधी, नागभीड, ब्रह्मपुरी, मूल, सावली, चिमूर या तालुक्यांना धानाचा पट्टा म्हटले जाते. धान उत्पादक मागील वर्षीच्या हंगामातील धान ठेवून तेच बियाणे म्हणून वापरतात. मात्र मागील वर्षी अत्यल्प उत्पादन झाल्यामुळे धान उत्पादकांनी हाती असलेले धानही विकून टाकले आहे. त्यामुळे आता त्यांच्यासमोर बियाण्यांचा मोठा बिकट प्रश्न आहे.