बळीराजाचे दु:ख संपता संपेना !
By admin | Published: June 25, 2014 11:39 PM2014-06-25T23:39:39+5:302014-06-25T23:39:39+5:30
बळीराजाला मागील काही दिवसांपासून निसर्गाचे ग्रहण लागले आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी सुका, प्रत्येक वेळी त्याचे भरून न येणारे नुकसान होत आहे. मागील वर्षी अतिवृष्टीने खरीप हंगाम
पावसाची दडी: खरीप हंगाम पुन्हा धोक्यात
चंद्रपूर: बळीराजाला मागील काही दिवसांपासून निसर्गाचे ग्रहण लागले आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी सुका, प्रत्येक वेळी त्याचे भरून न येणारे नुकसान होत आहे. मागील वर्षी अतिवृष्टीने खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातून हिरावला. यंदा मृग लोटूृन पंधरावाडा उलटल्यानंतरही पावसाची चिन्ह नाहीत. आणखी काही दिवस पाऊस नसल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळे खरीप हंगाम पुन्हा धोक्यात आला आहे.
मागील वर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने खरिपाची पेरणी केली. हंगामाच्या प्रारंभी अगदी वेळेवर पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे शेतकरी मोठ्या आनंदात होते. मात्र त्यानंतर पावसाने आपले उग्र रुप दाखविणे सुरू केले. गरज नसताना पाऊस मुसळधार स्वरुपात अविरत पडतच राहिला. जुलै, आगस्ट महिन्यात तर पावसाने कहरच केला होता. जिल्ह्यात तब्बल चारवेळा पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. खुद्द मुख्यमंत्र्यांनाही जिल्ह्याचा दौरा करावा लागला होता. जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार, २ लाख १६ हजार ४५० हेक्टर शेतीचे नुकसान झाले होते. अनेक शेतजमीन खरडून गेली होती. अनेक ठिकाणी शेतीमध्येतलावासारखे पाणी साचून होते. त्यामुळे मागील वर्षीच्या खरीप हंगामात अनेकांना शेती करणे अशक्य झाले होते. तरीही काही जणांनी शेतपिक कसेबसे पिकविले. मात्र मिळालेले उत्पन्न कर्जाचे ओझे हलके करू शकले नाही.
अतिवृष्टीची नोंद शासनदरबारीही घेण्यात आली. मात्र शासनाची मदत शेतकऱ्यांचे अश्रू पुसू शकली नाही. त्यानंतर रबी हंगामातही पावसाने दगा केला. ऐन पिक कापणीच्या वेळी पाऊस आल्याने शेतकऱ्यांचे पिक उद्ध्वस्त झाले. खरीपाचे कर्ज शेतकरी रबी हंगामातही फेडू शकला नाही.
मागील वर्षीच्या दोन्ही हंगामात झालेले नुकसान यंदा तरी भरून निघेल, या आशेपोटी शेतकरी मोठ्या उत्साहाने खरीपासाठी तयार झाला आहे. मशागतीची कामे आटोपली. सर्वात कठीण असलेली पैशाची जुळवाजुळवही केली. बियाणे, खतांची खरेदी केली. मृगाचा पाऊस पडला की जोमात पेरणी करायची, असा त्यांंचा मानस होता. मात्र पावसाने मृगात निराशा केली. पंधरवाडा उलटला. तरीही पावसाचे चिन्ह नाही. अलनिनोच्या प्रभावामुळे आणखी काही दिवस पाऊस पडणार नाही, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकऱ्यांची झोपच उडाली आहे. (शहर प्रतिनिधी)