वेकोलि प्रकल्पग्रस्तांची धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 10:33 PM2018-11-12T22:33:34+5:302018-11-12T22:33:53+5:30
वेकोलि बल्लारपूर क्षेत्रांतर्गत धोपटाळा येथे नव्याने सुरू होणाऱ्या विस्तारीत सास्ती युसी आणि टीओसी या प्रकल्पाकरिता सहा गावांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. मात्र शेतीचा मोबदला आणि नोकरी न दिल्याने अन्यायग्रस्त प्रकल्पग्रस्तांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाद्वारे धडक दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : वेकोलि बल्लारपूर क्षेत्रांतर्गत धोपटाळा येथे नव्याने सुरू होणाऱ्या विस्तारीत सास्ती युसी आणि टीओसी या प्रकल्पाकरिता सहा गावांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. मात्र शेतीचा मोबदला आणि नोकरी न दिल्याने अन्यायग्रस्त प्रकल्पग्रस्तांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाद्वारे धडक दिली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून इच्छामरणाच्या मागणीसह विविध मागण्यांकडे लक्ष वेधले.
धोपटाळा विस्तारीत खाणीसाठी धोपटाळा, भंडागपूर, मात्रा, सास्ती, कोलगाव, मानोली येथील ८७२.२७ हेक्टर जमीन वेकोलि अधिग्रहित केली. या प्रकल्पामुळे परिसरातील दहा हजार कुटुंब बाधित झाले आहेत. जमीन ताब्यात घेत असताना शेतकºयांना योग्य मोबदला आणि कुटुंबातील पात्र व्यक्तीला नोकरीत सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र वेकोलि प्रशासनाने आश्वासन पाळले नाही. २०१६ पासून आजपर्यंत किमान पाचदा आमरण उपोषण करण्यात आले होते. अर्धनग्न मोर्चा काढून वेकोलि प्रशासनाला मागणीचे निवेदन दिले. परंतु, दखल घेण्यात आली नाही. हक्काच्या जमिनी प्रकल्पात गेल्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. शिवाय सहा गावांतील पाणी दूषित झाल्याने आरोग्यवरही परिणाम होत आहे. प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनामुळे सास्ती व कोलगाव ग्रामपंचायतने ठराव पारीत केला होता. या ठरावानुसार वेकोलिच्या मनमानी कारभारामुळे प्रकल्पग्रस्तांवर काही परिणाम झाले, याचा तपशिल प्रशासनाकडे सादर केला होता. तेव्हापासून आजपर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या वेकोलिने मान्य केल्या नाहीत, असा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला. जिल्हा प्रशासनाने इच्छामरणाची परवानगी द्यावी, कोळशा खनन केल्यामुळे मातीचे मोठे ढिगारे तयार झाले. यामुळे पूर येतो, हे ढिगारे हटवावे, अशी मागणीही जिल्हाधिकारी डॉ. खेमणार यांना दिलेल्या निवेदनातून प्रकल्पग्रस्तांनी केली आहे.
निवेदनाला केराची टोपली
प्रकल्पग्रस्तांनी मोर्चा व आमरण उपोषण करण्यासोबतच वेकोलि प्रशासनाला अनेकदा निवेदन विनंतीपत्रे, स्मरणपत्रे दिली होती. ३ फेब्रुवारी २०१७ पासून एक आठवड्याचे उपोषणही झाले. दरम्यान वेकोलिने लेखी आश्वासन दिले होते. पण पालन केले नाही. निवेदनाला तर केराची टोपली दाखविली असा आरोप प्रकल्पग्रस्त कुटुंबियांनी केला आहे.
देवाडा खुर्दवासीय मोर्चाच्या तयारीत
पोंभुर्णा : कष्टकरी, गावकरी, निराधार, शेतकरी व बेरोजगारांच्या हक्कासाठी सोमवारी देवाडा खुर्द येथील नागरिकांचा मंगळवारी तहसील कार्यालयावर मोर्चा धडकणार आहे. रामपूर दीक्षित, कोसबी रिठ येथील निस्तार शासकीय जागा बोगस पट्टे मिळवून काही राजकीय दलालांनी कब्जा केला. त्यावरील कब्जा काढून गुरेढोरे चराईला मोकळी करून द्यावी, निस्तार हक्काची जागा गोठवणाऱ्या तत्कालीन महसूल उपविभागीय अधिकारी पराते यांची चौकशी करावी, सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी, आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदाराला देण्यात येणार आहे. शहरातील मुख्य मार्गाने मोर्चा काढण्यात येणार असून विविध मार्गावरून मार्गस्थ होताना हा मोर्चा तहसीलवर धडकणार आहे. मोर्चाची शेवट बसस्थानक चौकात होणार आहे, अशी माहिती सरपंच विलास मोगरकर व गावकºयांनी केली.