विदर्भवादी आंदोलक २५ आॅक्टोबरला कोळसा रोखणार
By admin | Published: October 22, 2015 12:57 AM2015-10-22T00:57:19+5:302015-10-22T00:57:19+5:30
स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करा आणि विदर्भातील जनतेचे वीज बिल निम्मे कमी करा, ...
विदर्भासाठी आंदोलन : वैदर्भीयांचे वीज बिल कमी करण्याची मागणी
चंद्रपूर : स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करा आणि विदर्भातील जनतेचे वीज बिल निम्मे कमी करा, या मागणीसाठी २५ आॅक्टोबरला कोळसा रोको आंदोलन छेडणार असल्याचा ईशारा विदर्भ राज्य आंदोलन समितीचे नेते अॅड. वामनराव चटप यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेतून दिला.
२५ आॅक्टोबरच्या आंदोलनाची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषकदेत ते म्हणाले, मागील तीन वर्षांपासून विदर्भ राज्य आंदोलन समिती स्वतंत्र विदर्भासाठी सतत आंदोलने करीत आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून नागपूर कराराची विदर्भभर होळी झाली. जिल्हास्तरीय धरणे झाले, विदर्भ गर्जना यात्रेने शंभरावर सभा घेऊन जनजागृती केली. राज्यकर्त्यांकडून अद्यापही ठोस आश्वासन मिळालेले नाही. केवळ जनतेची दिशाभूल करण्याचे काम सरकारकडून सुरू आहे. विदर्भ हे सक्षम राज्य होऊ शकते. येथील कोळश्यावर पश्चिम महाराष्ट्रातील कारखाने चालतात.
मात्र येथील शेतकरी अंधारात राहतो. प्रकल्पांच्या प्रदूषणाची झळ येथील नागरिक सोसत असले तरी त्याचा विचार कधीच होत नाही. प्रदुषणाची झळ येथील नागरिकांना बसत असल्याने आणि कोळश्यावर विदर्भाचा हक्क असल्याने विदर्भातील नागरिकांचे विज बिल निम्मे करावे, अशी मागणी असल्याचे चटप यांनी सांगितले.
आंदोलनाच्या दिवशी कोळश्याच्या वाहनांची अडवणूक करून राज्य सरकारला संकेत दिला जाणार आहे. विदर्भातील कोळसा वीज प्रकल्पात पोहोचला नाही तर प्रकल्प बंद पडून शकतात, याची जाणीव करून देण्यासाठी हे आंदोलन असल्याचे ते म्हणाले.
वणी येथे सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत हे आंदोलन होणार असून यात विदर्भातील जनतेने सहभागी होण्याची विनंतीही त्यांनी यावेळी केली. पत्रकारपरिषदेला किशोर पोतनवार, प्रा. एस.टी. चिकटे, प्रभाकर दिवे, आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)