विदर्भातील पहिले डायमंड कटिंग प्रशिक्षण केंद्र बल्लारपुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 09:40 AM2018-02-12T09:40:28+5:302018-02-12T09:43:02+5:30

हिऱ्याला पैलू पाडून त्याला आकर्षक आकार देण्याचे प्रकार देणारे प्रशिक्षण केंद्र बल्लारपुरात साकार झाले आहे. या डायमंड कटींग प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन रविवारी राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले.

Vidarbha's first Diamond Cutting Training Center, in Ballarpur | विदर्भातील पहिले डायमंड कटिंग प्रशिक्षण केंद्र बल्लारपुरात

विदर्भातील पहिले डायमंड कटिंग प्रशिक्षण केंद्र बल्लारपुरात

googlenewsNext
ठळक मुद्देदरवर्षी एक हजार तरुणांना रोजगाराची हमी

लोकमत न्यूज नेटवर्क 
चंद्रपूर : हिऱ्याला पैलू पाडून त्याला आकर्षक आकार देण्याचे प्रकार देणारे प्रशिक्षण केंद्र बल्लारपुरात साकार झाले आहे. हे प्रशिक्षण केंद्र विदर्भातील बेरोजगार तरुणांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. या डायमंड कटींग प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन रविवारी राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले.
उदघाटनीय कार्यक्रमात बोलताना ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर जिल्ह्यातील तरूणांना मोठया प्रमाणावर रोजगार उपलब्ध करणे ही आपली प्राथमिकता आहे. त्यादृष्टीने रोजगाराभिमुख विविध उपक्रम आपण सुरू करीत आहोत. बल्लारपुरात डायमंड कटींग प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून दर महिन्याला प्रशिक्षणार्थ्याला २० हजारावर रोजगार देण्याचा व तीन वर्षात तीन हजार तरूण त्या माध्यमातून प्रशिक्षित करण्याचा आमचा मानस आहे. प्रतिवर्ष एक हजार तरूण या प्रशिक्षण केंद्रातून बाहेर पडतील.
तरूणांसाठी आर्थिक स्वातंत्र्याच्या अभियानाला सुरूवात आम्ही या जिल्ह्यात केली आहे. चांदा ते बांदा हा उपक्रम रोजगाराभिमुख आहे. याचे कौतुक निती आयोगाने सुध्दा केले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात राजुरा येथे विमानतळ विकासासाठी १२०० एकर जागा उपलब्ध झाली आहे. बल्लारपूर येथे पोलीस प्रशिक्षण केंद्रसुध्दा सुरू होणार आहे. हिंगणघाटचे मोहता यांच्या मदतीने बल्लारपूर येथे महिलांना कापड निर्मिती करण्याचे प्रशिक्षण व त्यांना रोजगार देण्याचा करार करण्यात आला आहे, असेही ना. मुनगंटीवार यांनी सांगितले.
यावेळी मंचावर महाराष्ट्र वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, उपाध्यक्षा मिना चौधरी, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, शिवचंद द्विवेदी, भय्याजी येरमे, रेणुका दुधे, एन.डी. जेम्स या संस्थेचे प्रमुख निलेश गुल्हाने आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. यावेळी निलेश गुल्हाने म्हणाले, डायमंड उद्योगामध्ये मी गेले १५ वर्षे काम करीत आहे. डायमंड कटींग प्रशिक्षण केंद्र उभे करण्याची माझी तीव्र इच्छा होती. सुरत, मुंबईमध्ये हिऱ्यांचे व्यापारी मोठया संख्येने आहेत. मात्र त्यांना प्रशिक्षित तरुण मिळत नाही. रोजगारांची शंभर टक्के हमी असून किमान २० हजार रुपये वेतनाचा रोजगार मिळू शकतो. ना. सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रक्रियेत मला दिलेल्या पाठिंब्यामुळे व सहकायार्मुळे हे केंद्र उभे राहू शकले.
बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा म्हणाले, गेल्या तीन वर्षात १३८ कोटीहून अधिक निधी बल्लारपूरच्या विकासासाठी ना. मुनगंटीवारांनी खेचून आणला आहे. आरोग्य सेवा बळकट करण्यावर त्यांनी प्रामुख्याने बळ दिले आहे. संचालन काशिनाथ सिंग यांनी केले तर आभार स्वप्ना पंचलवार यांनी मानले.

काय आहे डायमंड कटींग ?
डायमंड कटींग आणि प्रोसेसिंग याबाबतचे रहिवासी प्रशिक्षण चार महिन्यात देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणादरम्यान भोजन व निवास व्यवस्था नि:शुल्क आहे. एन.डी. जेम्स ही कंपनी मुलांना हिऱ्यांना पैलू पाडण्याचे प्रशिक्षण देणार आहे. सोबतच या ठिकाणी प्रशिक्षण घेतल्यानंतर सुरत तसेच मुंबई येथे रोजगार देण्याची हमीसुध्दा देणार आहे. पुढील तीन वर्षात तीन हजार मुलांना प्रशिक्षण व रोजगार देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारे हमी देऊन प्रशिक्षण देणारा हा पहिलाच प्रयोग आहे.

Web Title: Vidarbha's first Diamond Cutting Training Center, in Ballarpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.