गेवरा-सायखेडा गोसेखुर्दच्या नहराजवळ दोन पट्टेदार वाघाचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:19 AM2021-06-10T04:19:46+5:302021-06-10T04:19:46+5:30
सावली वनपरिक्षेत्रातील गेवरा-सायखेडा परिसरात घनदाट जंगल आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात वाघ असल्याचे अनेकदा आढळून आले आहे. मंगळवारी गेवरा-सायखेडा ...
सावली वनपरिक्षेत्रातील गेवरा-सायखेडा परिसरात घनदाट जंगल आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात वाघ असल्याचे अनेकदा आढळून आले आहे. मंगळवारी गेवरा-सायखेडा परिसरातील गोसेखुर्दच्या नहराजवळ दोन वाघ आढळून आले. यापूर्वी मागील काही दिवसापूर्वी तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून जखमी केले होते. तसेच निफ्रदा परिसरात एका शेतकऱ्याचा बळी वाघाने घेतला होता. आता चक्क नहराजवळ दोन मोठ्या पट्टेदार वाघाचे दर्शन झाले. त्यातच शेतीचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. वनविभागाने गावकऱ्यांना शेतात किंवा जंगलात जाताना एकट्याने न जाता समूहाने जावे, अशा सूचना दिल्या आहेत. तसेच परिसरात गस्त वाढविली असून वाघाच्या बंदोबस्तासाठी आठ जणांचे पथक तयार केले असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी कामडी, वनपाल व्ही. सी. धुर्वे यांनी दिली.