पोलीस पाटलाच्या सतर्कतेने यंत्रातील बिघाड उघड
By Admin | Published: February 17, 2017 12:53 AM2017-02-17T00:53:10+5:302017-02-17T00:53:10+5:30
तालुक्यातील करंजी-धानापूर जिल्हा परिषद क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या विहीरगाव मतदान केंद्रावर मतदानाची गुरुवारी सकाळी ७.३० वाजता तयारी झाली होती.
तासभराने सुरूवात : विहीरगाव मतदान केंद्रावरील प्रकार
गोंडपिपरी : तालुक्यातील करंजी-धानापूर जिल्हा परिषद क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या विहीरगाव मतदान केंद्रावर मतदानाची गुरुवारी सकाळी ७.३० वाजता तयारी झाली होती. मतदानासाठी मतदाराने बॅलेट युनिटची बटन दाबली. मात्र बॅलेट युनिटचे लाईटच न लागल्याने त्याने मतदान यंत्रातील बिघाड मतदान अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिला. त्यामुळे तासभराने यंत्र दुरूस्त झाल्यावर मतदानाला सुरूवात झाली. तालुक्यातील करंजी-धानापूर जि.प. मतदारसंघात विहीरगाव येथील केंद्रावर गुरुवारी मतदान असल्याने मतदान अधिकारी व कर्मचारी बुधवारी दुपारी दाखल झाले.गुरूवारी सकाळी ७.३० वाजेपर्यंत पूर्वतयारी होऊन मतदानाला सुरूवातही झाली. विहीरगावचे पोलीस पाटील जानकीराम झाडे यांनी बॅलेट युनिटची बटन दाबून मतदान केले. मात्र बॅलेट युनिटचा लाईटच लागला नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी मतदान यंत्रातील बिघाड मतदान अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले. याची दखल घेत मतदान अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. सूचना मिळाल्याबरोबर या केंद्रावर फिरते पथक तत्काळ दाखल झाले. दुसरे मतदान यंत्र बसविले. मात्र त्यातही बिघाड दिसून आला. त्यामुळे तिसऱ्या मतदान यंत्राची मागणी करण्यात आली. मतदान यंत्र पूर्ववत करण्यासाठी जवळपास तासाभराचा कालावधी लागल्याने मतदारांना ताटकळत राहावे लागले.
(शहर प्रतिनिधी)