बल्लारशाह रेल्वे रनिंग रूममध्ये चौकशीसाठी व्हिजिलन्सची चमू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:34 AM2021-09-07T04:34:31+5:302021-09-07T04:34:31+5:30
बल्लारपूर : मध्य रेल्वे बल्लारशाह लोको पायलट व गार्ड रनिंग रूममध्ये मुंबईतील व्हिजिलन्सच्या सहा अधिकाऱ्यांची चमू सोमवारी दाखल झाली. ...
बल्लारपूर : मध्य रेल्वे बल्लारशाह लोको पायलट व गार्ड रनिंग रूममध्ये मुंबईतील व्हिजिलन्सच्या सहा अधिकाऱ्यांची चमू सोमवारी दाखल झाली. त्यानंतर दिवसभर चौकशी केल्यामुळे रेल्वे प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. विशेष म्हणजे, चौकशीसंदर्भात अधिकाऱ्यांनी कमालीची गुप्तता बाळगल्याने नेमकी चौकशी कोणाची सुरू होती, यासंदर्भात माहिती मिळू शकली नाही. मात्र परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवल्यामुळे मोठे घबाड उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सोमवारी रेल्वे रनिंग रूममध्ये दररोजची कामे सुरू असतानाच व्हिजिलेन्सची मुंबईतील चमू दाखल झाली आणि येथील कामगार, पर्यवेक्षक व कंत्राटदारांची चौकशी सुरू केल्याची माहिती मिळाली आहे. या चौकशीबाबत गुप्तता बाळगल्यामुळे नेमकी माहिती मिळू शकली नाही. मात्र ही चौकशी रनिंग रूममध्ये खानपान व इतर काम करणाऱ्या कामगारांना पूर्ण पगार दिला जात नसल्याने केलेल्या तक्रारींसंदर्भात असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे हे प्रकरण अधिकाऱ्यांच्या अंगलट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
बाॅक्स
बल्लारशाह लोको पायलट व गार्ड रनिंग रूम हे मध्य रेल्वेच्या सुपरफास्ट रेल्वेगाड्यांना घेऊन जाणाऱ्या इंजिन चालक व गार्ड तसेच तिकीट निरीक्षकांनी आराम करण्यासाठी आहे. बल्लारशाह रेल्वेस्थानकावर हा वर्ग बदलतो. ते रनिंग रूममध्ये आराम करून दुसऱ्या दिवशी ठरलेल्या ठिकाणी रेल्वे गाडी घेऊन जातात. या सर्वांच्या व्यवस्थेसाठी येथे कामगारांची नेमणूक करण्यात आली आहे. वर्षातून एकदा ही चमू प्रत्येक ठिकाणी जाऊन कामाचे निरीक्षण करीत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. मात्र रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये वेगळीच चर्चा होती.
060921\img-20210906-wa0278.jpg
रेल्वे रनिंग रूम