वडेट्टीवार यांनी माहिती दडवल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2020 03:08 AM2020-05-26T03:08:39+5:302020-05-26T03:08:55+5:30
वडेट्टीवार यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात शिवानी इंफ्राटेक या कंपनीकडून १ लाख ५० हजार रुपये स्वत:च्या आणि ३ कोटी ९४ लाख त्यांच्या पत्नीच्या नावावर कर्ज दाखविले आहे.
चंद्रपूर : जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधानसभा निवडणुकीसाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात ज्या कंपन्यांच्या नावावर कर्ज घेतल्याचा उल्लेख केलेला आहे. त्या कंपन्या बंद असल्याची तक्रार येथील दीपक मोहता यांनी पोलीस व आयकर विभागाकडे केली आहे.
वडेट्टीवार यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात शिवानी इंफ्राटेक या कंपनीकडून १ लाख ५० हजार रुपये स्वत:च्या आणि ३ कोटी ९४ लाख त्यांच्या पत्नीच्या नावावर कर्ज दाखविले आहे. ही कंपनी जुलै २०१८ लाच बंद झालेली दाखवण्यात आलेली आहे. त्यामुळे बंद झाल्यावर त्या कंपनीत कुणाचेही घेणे देणे नसते. दुसरी एक पार्टनरशिप फर्म देवयानी लॉजिस्टिक याचाही वडेट्टीवार यांनी उल्लेख प्रतिज्ञापत्रात केलेला नाही.
प्रधान हॉस्पिटल नावाच्या कंपनीत त्यांनी एक १ कोटी ८४ लाख ८५ हजार गुंतवलेले आहे. तर पत्नीच्या नावाने ६८ लाख गुंतवलेले असून त्याचाही प्रतिज्ञापत्रात उल्लेख नाही, अशी तक्रार दीपक मोहता यांनी केली आहे. याबाबत चंद्रपूर जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्याशी संपर्क साधला असता अशी कुठल्याही प्रकारची तक्रार आपणाकडे आली नसल्याचे स्पष्ट केले.
ब्लॅकमेलींगचा प्रकार
निवडणुकीच्या काळापासून ४५ दिवसाच्या आत कुठेही तक्रार करून चौकशीची मागणी करता येते. मूळात त्यांनी इलेक्शन पीटीशन करायला पाहिजे. त्याचे उत्तर आम्ही देऊ. परंतु तक्रारीची कॉपी आगाऊ आठ दिवसांपूर्वी माझ्याकडे पाठवितो आहे. याचाच अर्थ दीपक मोहताचा उद्देश काय आहे हे स्पष्ट होते. त्यांच्या तक्रारीत काही तथ्य नाही. या मोहताचा बोलविता धनी कोण आहे, तो कुठे राहतो. ही सगळी माहिती माझ्याकडे आहे.
- विजय वडेट्टीवार,
मदत व पुनर्वसन मंत्री