विजय वडेट्टीवार व सुभाष धोटे यांनी विधानसभेत विचारले सर्वाधिक प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 03:07 PM2024-10-05T15:07:48+5:302024-10-05T15:09:38+5:30

संपर्क संस्थेचा अहवाल जाहीर, जोरगेवार व भांगडिया पाच व सहाव्या स्थानी; ९२ महिला आमदारांतून धानोरकर राज्यात प्रथम

Vijay Wadettiwar and Subhash Dhote asked the most questions in vidhansabha | विजय वडेट्टीवार व सुभाष धोटे यांनी विधानसभेत विचारले सर्वाधिक प्रश्न

Vijay Wadettiwar and Subhash Dhote asked the most questions in vidhansabha

राजेश मडावी 
लोकमत न्यूज नेटवर्क 
चंद्रपूर :
विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असतानाच १४ व्या विधानसभेच्या २०१९ ते २०२४ या पंचवार्षिक कालावधीत आमदारांनी किती प्रश्न मांडले, याबाबत विश्लेषण करणारा मुंबईच्या 'संपर्क' संस्थेचा अहवाल २७ सप्टेंबर २०२४ रोजी जाहीर झाला. त्यानुसार, जिल्ह्यातील सहा आमदारांमधून विरोधी पक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार व सुभाष धोटे यांनी सर्वाधिक प्रश्न विचारले. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार चौथ्या क्रमांकावर, किशोर जोरगेवार पाचव्या; तर बंटी भांगडिया हे सहाव्या स्थानी आहेत. विशेष म्हणजे, पहिल्या टर्ममधील ९२ महिला आमदारांत सर्वाधिक प्रश्न विचारण्यात विद्यमान खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.


लोकशाहीत लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा करताना त्यांच्या नेमक्या जबाबदाऱ्या काय, आपण कशासाठी निवडून दिले, हे मतदारांना कळायला हवे. शिवाय, निवडणूक लढविणाऱ्यांनाही निवडून आलो, तर कामे कोणती, याचे उत्तरदायित्व संविधानाने ठरवून दिले आहे. आपण लोककल्याणकारी राज्यव्यवस्था स्वीकारल्याने लोकप्रतिनिधींनी जनतेच्या किती प्रश्नांवर आवाज उठविला, या कामगिरीचे मूल्यमापन आवश्यक ठरते. या दृष्टीने राज्यातील सर्व आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांचा अभ्यास करून संपर्क संस्थेने एक अहवाल जाहीर केला. यातून जिल्ह्यातील सहा आमदारांनी विधीमंडळात मांडलेल्या १ हजार ४२ प्रश्नांची माहिती पुढे आली आहे. 


जिल्हातील आमदारांनी कोणते प्रश्न विचारले आणि कोणते विसरले?
अपघात २२, व्यसन १२, पशुसंवर्धन ७, आपत्ती १२, संस्कृती, वारसा, किल्ले १०, दिव्यांग ५, वृद्ध १, बेरोजगारी उपजीविका ४, शेतकरी ६९, मच्छीमार ५, अन्न पुरवठा ७, वन व वन्यप्राणी १३, अनुदान १०, उच्च शिक्षण २३, गैरव्यवहार, गैरकृत्य, गैरवर्तन ७८, उद्योग २१, २१, महागाई १, मूलभूत सुविधा ६९, कामगार २०, वाचनालय ०, खनिज, जमीन २१, अल्पसंख्य २, ओबीसी, एसटी एसएसी, व्हीजेएनटी, एनटी १७, पोलिस १०, धोरण ५, पुनर्विकास ५, पुनर्वसन ३. आरक्षण ५, स्वच्छता ९, कौशल्य शिक्षण ४, झोपडपट्टी ५, क्रीडा २, पर्यटन ५ व वाहतुकीशी संबंधित १९ प्रश्न आमदारांनी विधानसभेत मांडले.


पुरुष व महिला आमदारांतही प्रतिभा धानोरकर अव्वल 
तत्कालीन आमदार प्रतिभा धानोरकर यांनी विधानसभेत ३१६ प्रश्न मांडून राज्यातील ९२ नवीन महिला आमदारांत पहिला क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे, पुरुष व महिला आमदारांतही राज्यातून सहाव्या स्थानी आहेत. त्यांनी आरोग्यावर ३१, शिक्षण २१, पाणी ७, शेती ७, बेरोजगारी २, बालविकास १२, महिला- मुली ८ व आदिवासींबाबत ९ प्रश्न विचारले होते.


मुनगंटीवारांनी मांडले २०५ प्रश्न
विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांनी सर्वाधिक ३८० प्रश्न मांडले. मागील विधानसभेतही तेच जिल्ह्यातून पुढे होते. पालकमंत्री मुनगंटीवार यांनी २०५ प्रश्न मांडले. २०२२ पासून ते आता मंत्रिपदी आहेत. आमदार धोटे यांनी ३३३ प्रश्न विचारून जिल्ह्यात द्वितीय ठरले. अपक्ष आमदार जोरगेवार यांनी ११७ प्रश्न विचारून पाचव्या स्थानी आहेत. चिमूरचे आमदार बंटी भांगडिया हे यांनी मागील विधानसभाप्रमाणे यावेळी सर्वांत कमी प्रश्न विचारले. 


विधानसभेत मांडलेली प्रश्नसंख्या १,४२४
आमदार                                                                                 प्रश्नसंख्या                   
विजय वडेट्टीवार (मंत्री जून २०२२ पर्यंत, ब्रह्मपुरी)                         ३८० 
सुभाष धोटे (राजुरा)                                                                      ३३३ 
प्रतिभा धानोरकर (मे २०२४ पर्यंत आमदारपदी, वरोरा)                  ३१६ 
सुधीर मुनगंटीवार (मंत्री २०२२ पासून, बल्लारपूर)                          २०५ 
किशोर जोरगेवार (चंद्रपूर)                                                            ११७
बंटी भांगडिया ( चिमूर)                                                                   ७३ 

Web Title: Vijay Wadettiwar and Subhash Dhote asked the most questions in vidhansabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.