ग्रामरोजगार सेवक करणार काम बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:31 AM2021-08-20T04:31:58+5:302021-08-20T04:31:58+5:30
वासेरा : ग्राम रोजगार सेवक यांचे मानधन, प्रवास भत्ता, प्रशासकीय खर्चाची रक्कम न मिळाल्यामुळे बेमुदत काम बंद आंदोलन करण्याबाबत ...
वासेरा : ग्राम रोजगार सेवक यांचे मानधन, प्रवास भत्ता, प्रशासकीय खर्चाची रक्कम न मिळाल्यामुळे बेमुदत काम बंद आंदोलन करण्याबाबत संवर्ग विकास अधिकारी यांना निवेदन सादर केले.
ग्रामरोजगार सेवक मागील १४ वर्षांपासून प्रामाणिकपणे कामे करीत आहेत. तालुक्यातील मजुरांना मोठ्या प्रमाणात मजुरीची कामे उपलब्ध करून देणारा ग्राम रोजगार सेवक हाच महत्त्वाचा घटक आहे. लेबर बजेट तयार करणे, कामाची निवड करणे, कामाचे अंदाजपत्रक तयार करणे, मजुरांची कामाची डिमांड सादर करणे, मस्टर भरणे, कामावर देखरेख ठेवणे, मजुरांची मजुरी त्यांच्या खात्यात जमा करणे, मजुरांच्या, शेतकऱ्यांच्या, नागरिकांच्या समस्या निकाली काढणे, ग्रामपंचायतीमधील लेखे तयार करणे, सांभाळून ठेवणे अशी विविध प्रकारची कामे करीत असतो. परंतु याच घटकावर उपासमारीची वेळ आली आहे. मागील दोन वर्षांपासून प्रवास भत्ता नाही. चार वर्षांपासून प्रशासकीय खर्चाची रक्कम मिळाली नाही. सहा महिन्यांपासून केलेल्या कामाचे मानधन मिळाले नाही. या समस्या दूर झाल्या नाहीत, तर काम बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून दिला आहे. निवेदन देताना ग्रामरोजगार सेवक संघटनेचे सिंदेवाही तालुकाध्यक्ष सुधाकर मडावी, सचिव धर्मा कोटेवार, मंगेश बेले, संतोष दुर्वे, नरेंद्र बनसोड उपस्थित होते.