रेल्वेला कर्मचारी पुरविणारे एक गाव
By admin | Published: October 25, 2015 12:51 AM2015-10-25T00:51:54+5:302015-10-25T00:51:54+5:30
काही काही गावाचे एक वैशिष्ट्य असते आणि या वैशिष्ट्यामुळेच त्या गावाची पंचक्रोशीत ओळख निर्माण होत असते.
नागभीड : काही काही गावाचे एक वैशिष्ट्य असते आणि या वैशिष्ट्यामुळेच त्या गावाची पंचक्रोशीत ओळख निर्माण होत असते. नागभीड तालुक्यातील नवेगाव पांडव या गावाचेही असेच आहे. तेथील रेल्वे कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेता या गावाची ओळख रेल्वे कर्मचाऱ्यांचे गाव म्हणूनच निर्माण झाली आहे.
नवेगाव पांडव हे गाव नागभीडपासून सात कि.मी. अंतरावर आहे. नागभीड येथे रेल्वेचे जंक्शन आहे. नागभीड येथूनच गोंदिया, नागपूर आणि चंद्रपूरकडे रेल्वे गाड्या रवाना होतात. नागभीडची रेल्वे १०० ते १२५ वर्षांपूर्वीची आहे. त्याकाळी रेल्वेच्या निर्माणाकरिता कामगारांची मोठ्या प्रमाणावर गरज होती. आणि लोकांना कामाची, या गरजेतूनच लोक रेल्वेकडे वळले असावेत.
सदर प्रतिनिधीने या गावात जावून रेल्वेत कार्यरत असलेल्या व्यक्तींची माहिती काढली असता ६० ते ७० व्यक्ती आजही रेल्वेत कार्यरत असल्याची माहिती मिळाली. अनेकजण निवृत्त झाले आहेत. निवृत्त लोकांची संख्या लक्षात घेतली तर ही संख्या १०० च्या घरात पोहचते. हे कार्यरत कर्मचारी केवळ नागभीड येथेच कार्यरत नाहीत तर विदर्भ व इतर भागातही कार्यरत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अरुण फुकट, रमेश फुकट, आनंद फुकट, मंसाराम पांडव, रामभाऊ चौधरी, शांताराम लटारे, मनोज आटमांडे, हिवराज कोहपरे, गोपाळा म्हशाखेत्री, थामदेव बोरकुटे, बंडू आटमांडे, मारोती ठाकरे, निरंजन शेंडे, प्रकाश लटारे, सुधाकर पांडव, खेकारे, सुमित पानसे, अनिल रामटेके, भगवान मेश्राम, श्रावण ठाकरे, किसन पांडव, रामेश्वर पांडव, निखिल नवघडे, अशोक उरकुडे, रामटेके, कवलदास बोरकुटे, नवघडे, पांडव, कुडलिक अटमांडे, हरिचंद्र निमगडे, माधुरी रडके, नागोजी रडके, बाबुराव आटमांडे, विठ्ठल तिवाडे, मारोती म्हशाखेत्री, महादेव म्हशाखेत्री, गोपाळा म्हशाखेत्री, मारोतीलाल पांडव, नामदेव आटमांडे, कवडू नवघडे, चंद्रुजी पांडव, रघुनाथ पानसे, पंढरी तिजारे, शशिभूषण रामटेके, दामोदर नवघडे, गुलाब बोरकुटे, श्रीपत बोरकुटे, श्रीराम बोरकुटे आदी रेल्वेत कार्यरत व निवृत्त लोकांची नावे मिळाली. उल्लेखनीय बाब अशी की, अनेक कर्मचारी मृत पावले असून त्याचे कुटुंबीय निवृत्ती वेतन घेत आहेत. निवृत्तीवेतन धारकांचीही संख्याही बरीच आहे. केवळ रेल्वेतच नाही तर शिक्षण आणि प्रशासनाच्या इतर विभागातही या गावातील कर्मचाऱ्यांची संख्या बरीच आहे. गावात कर्मचारी बरेच असल्याने एक सधन गाव अशीही या गावाची ओळख आहे. (तालुका प्रतिनिधी)