वाघापासून बचावासाठी ‘गाव बचाव मोहीम’
By Admin | Published: July 8, 2014 11:24 PM2014-07-08T23:24:33+5:302014-07-08T23:24:33+5:30
मानव व वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना करूनही वाघांना रोखणे कठीण झाले आहे. मात्र आता वनविभागाकडून हिमाचल प्रदेशातील वन्यजीव संवर्धन तज्ज्ञ डॉ. रुद्र यांच्या मार्गदर्शनाखाली
आवळगाव : मानव व वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना करूनही वाघांना रोखणे कठीण झाले आहे. मात्र आता वनविभागाकडून हिमाचल प्रदेशातील वन्यजीव संवर्धन तज्ज्ञ डॉ. रुद्र यांच्या मार्गदर्शनाखाली ‘बस्ती बचाव मोहीम’ राबविण्यात येत आहे. अशीच मोहिम ब्रह्मपुरी तालुक्यातील हळदा येथे राबवून शेतकऱ्यांना व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे करुन प्रशिक्षण देण्यात आले.
दक्षिण ब्रह्मपुरी वनविभागाअंतर्गत येत असलेल्या हळदा येथे सध्या वाघांची दहशत आहे. मानवी वस्तीवर वाघांचे आक्रमण होत असून त्यामध्ये मनुष्याहानी होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र वनविभागाकडे वाघांच्या आक्रमणातून मानवाच्या बचावासाठी ठोस उपाययोजना नसल्याने वनविभागाने याबाबत डॉ. रुद्र यांच्या मार्गदर्शनाखाली बस्ती बचाव मोहिम राबविण्याचे निश्चित केले. या मोहिमेद्वारे वाघांना व वन्यप्राण्यांना मानवी वस्त्यांपासून दूर ठेवण्यासाठी विशेषत: स्थानिक नागरिकांचे सहकार्य मोठ्या प्रमाणात घ्यावे लागते. त्या दृष्टीने हळदा येथे नुकतेच मार्गदर्शन देण्यात आले.
हळदा येथील नागरिकांनी वाघांपासून बचावासाठी व शेतपिकाची हानी रोखण्यासाठी बस्ती बचाव मोहिमेला सहकार्य करण्याचे ठरविले आहे.
सध्या हळदा परिसरात वाघांचे वास्तव्य असून मागील महिन्यात वाघाच्या हल्ल्यात एका इसमाचा मृत्यू झाला होता. याच परिसरात दोघांना गंभीर जखमी केले होते. आजवर अनेक पाळीव प्राण्यांना वाघाने ठार मारले. या घटनांमुळे हळदा गावासह परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
येथील लोकांनी वनविभागाला टार्गेट करुन आक्रमक भूमिका घेतली होती. दरम्यान, ही बाब लक्षात घेऊन वनविभागाने डॉ. रुद्र यांना पाचारण करुन त्यांच्या माध्यमातून येथील नागरिकांना प्रशिक्षण दिले. यावेळी सहाय्यक उपवन संरक्षक, मेश्राम, वनक्षेत्र अधिकारी- पत्रे, वैरागडे, खोब्रागडे व सिंदेवाही, नागभीड, ब्रह्मपुरी (दक्षिण उत्तर) वनविभागाचे कर्मचारी, सरपंच, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)