गावोगावी शेणखत व दुधाची टंचाई
By admin | Published: May 11, 2017 12:41 AM2017-05-11T00:41:48+5:302017-05-11T00:41:48+5:30
पूर्वी ग्रामीण भागातील गावोगावी दिसणारे जनावरांचे कळप आता दिसेनासे होत आहेत.
सिंदेवाही तालुका : चाराटंचाईमुळे पशुधनात मोठी घट
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदेवाही : पूर्वी ग्रामीण भागातील गावोगावी दिसणारे जनावरांचे कळप आता दिसेनासे होत आहेत. या दशकात पाळीव जनावरांच्या संख्येत सिंदेवाही तालुक्यात मोठी घट झाली असून चाऱ्याअभावी शेतकरी जनावरांना विक्रीस काढत आहेत. त्यामुळे शेतीसाठी लागणारे शेणखत व दुध टंचाई निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
देशातील ७५ टक्के जनता आजही कृषी व्यवसायावर अवलंबून आहे. पूर्वी शेतीच्या मशगातीसाठी शेतकरी बैलांचा वापर करायचे. परिणामी शेतकऱ्यांच्या जीवा भावाचा सखा म्हणून बैलाच ओळख होती. आधुनिक काळात विज्ञानाच्या प्रगतीमुळे शेतकरी यांत्रिक शेतीकडे वळत आहेत. दुसरीकडे शेतमजुराच्या मजुरीत पाचपटीने वाढ झाली आहे. यामुळे शेती करणे धान उत्पादक शेतकऱ्यांना न परवडणारे आहे. पूर्वी शेतकऱ्यांच्या अंगणात बैलाचा गोठा असायचा. त्या गोठ्यात बैल व गाय दिसत हे त्यांच्यासाठी भूषणावह होते. आता जनावरांची संख्या कमी झाल्याने बैलाचे मोठे दिसेनासे झाले आहे. पूर्वी जंगलात जनावरांसाठी कुरण राखूनठेवायचे. आत कुरणेही नष्ट होत आहेत. जनावरांपासून मिळत दुध, दही, लोणी, तुप शेतकऱ्यांच्या घरीच बनविले जात होते.
सोबत शेणखत तयार होत होते. शेतातील पिकाचे उत्पादन वाढ होत होती. त्यामुळे रासायनिक खताची गरज पडत नव्हती. प्रत्येक गावात दोन चार गुराखी जनावरांचे कळप जंगलात चारायला नेत होते. आता मात्र गावात जनावर कळप राखायला गुराखी मिळत नाही.
चाऱ्याचे जंगल सपाट
सध्या सर्वत्र जंगले विरळ होत आहेत. अवैध वृक्षतोडीला उद्याण आले आहे. परिणामी जंगले कमी होत असून जनावराला हिवरा चारा मिळणे कठीण झाले आहे. जंगलात चाराच उपल्ध नसल्याने जनावरांना कुठे चारावे, असा प्रश्न पशुपालकांना पडत आहे. त्यातही काही जंगलावर अतिक्रमण झाले आहे. अतिक्रमणधारक तथे शेती करतात. अतिक्रमणधारक शेतकरी गावातील जनावरांना येथे चरण्यासाठी येऊ देत नाहीत. त्यामुळे जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.
पिशवीच्या दूधाला प्राधान्य
ग्रामीण भागात दूध मिळत नसल्यामुळे नाईलाजाने फ्लॉस्टिक पिशवीमधील दूध विकत घ्यावे लागत आहे. नवजात बालकांनाही गायी, म्हशीचे दूध मिळणे अशक्य झाले आहे. शेती उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना पशुसंवर्धन विभागाकडे पशु वृद्धीसाठी विविध योजना आहेत. त्यात दुधाळू जनावरे वाटपाची योजना आहे. तथापि शेतकऱ्यांकडे चारा पाणी उपलब्ध नसल्याने या योजनेचा लाभ घेण्याची हिमत शेतकरी दाखवित नाहीत.