काळ्याबाजारात जाणारे शासकीय धान्य गावकऱ्यांनी पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:26 AM2020-12-22T04:26:49+5:302020-12-22T04:26:49+5:30

वढोली : गोंडपिपरी तालुक्यातील घडोली येथील स्वस्त धान्य दुकानदार शंकर कन्नाके याला रेशनचा माल काळ्याबाजारात नेताना गावकऱ्यांनी पकडले.याबाबत गोंडपिपरी ...

The villagers caught the government grain going to the black market | काळ्याबाजारात जाणारे शासकीय धान्य गावकऱ्यांनी पकडले

काळ्याबाजारात जाणारे शासकीय धान्य गावकऱ्यांनी पकडले

Next

वढोली : गोंडपिपरी तालुक्यातील घडोली येथील स्वस्त धान्य दुकानदार शंकर कन्नाके याला रेशनचा माल काळ्याबाजारात नेताना गावकऱ्यांनी पकडले.याबाबत गोंडपिपरी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर स्वस्त धान्य दुकानदार व वाहन चालकास अटक करण्यात आली आहे. ही घटना शनिवारी रात्री घडली.

घडोली येथील सरकारी रास्त धान्य दुकानदार शंकर कन्नाके हा शासकीय अन्नधान्याचा माल खुलेआम काळ्याबाजारात विकू लागला. अनेक दिवसांपासून चाललेल्या त्याच्या या कारभाराला गावकरी कंटाळले. अशावेळी ग्राहक लाभार्थी अन्नधान्याची उचल करण्यास दुकानात गेले असता त्यांना जादा दराने माल वितरित करायचा. सोडविलेले धान्य महिनाभरापर्यंत वाटप करणे शक्य आहे व तसा शासन आदेश राहूनसुध्दा केवळ दोन ते तीन दिवसच हा दुकानदार माल वितरित करीत होता. याचदरम्यान चौथ्या दिवशी धान्य घ्यायला कुणी लाभार्थी दुकानात गेलाच तर त्यांना कोटा संपला, तुम्ही ठरवलेल्या दिवशी आले नाही. त्याला मी काय करू? असे दिशाभूल करणारे उत्तर देऊन प्रसंगी अरे-तुरेची भाषा देखील वापरायचा,असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. कन्नाकेच्या या प्रतापाने गावातील नागरिक हैराण झाले आणि संतापलेल्या लोकांनी शेवटी आमच्या गावातील नागरिकांच्या वाट्याचा कोटा जातो कुठे? असा प्रश्न करीत त्यांनी याचा छडा लावण्यासाठी एकत्र आले. घडोली येथील गावकऱ्यांची यासाठी पथके तयार झाली.यामाध्यमातून लोकांनी कन्नाके यांच्या कारभारावर नजर ठेवली.दुकानदारावर पाळत ठेवली असता शनिवारी घडोली येथील हनुमान मंदिर परिसरातून एमएच ३४ डी ५७८९ या क्रमांकाच्या आटोत मोठ्या चुंगळयांमध्ये काहीतरी कोंबून नेत असल्याचे गावकऱ्यांना दिसून आले. संपूर्ण प्रकार संशयास्पद राहिल्यामुळे आटोला थांबवून वाहकाला विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. यानंतर वाहकाला न जुमानता गाडीत कोणती वस्तू आहे, याची शहानिशा गावकऱ्यांनी केली. त्यावेळी पांढऱ्या रंगाच्या सात चुंगड्यामध्ये शासकीय धान्य वितरण व्यवस्थेचा तांदूळ भरून दिसला. लगेच अन्नपुरवठा निरीक्षक संघपाल मेश्राम यांना गावकऱ्यांनी घटनेची माहिती दिली. मेश्राम बाहेरगावी असल्यामुळे त्यांनी सदर घटनेसंदर्भात पोलिसांना कळविले. माहिती मिळताच ठाणेदार संदीप धोबे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आटोमधील माल ताब्यात घेऊन वाहन चालक व दुकानमालक शंकर कन्नाके यांना अटक केली. घटनेचा तपास ठाणेदार धोबे यांनी केला असून प्रकरणाची सखोल चौकशी गोंडपिपरी पुरवठा विभागामार्फत सुरू आहे.

Web Title: The villagers caught the government grain going to the black market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.