त्या प्रस्तावित कोळसा खाणीला चालबर्डी (कों.) ग्रामस्थांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:27 AM2021-03-08T04:27:21+5:302021-03-08T04:27:21+5:30
भद्रावती : तालुक्यात अडीच हजार हेक्टरमध्ये प्रस्तावित असलेल्या वेकोलिच्या कोळसा खाणीला चालबर्डी (कों.) येथील ग्रामस्थांनी विरोध दर्शविला असून, चालबर्डी ...
भद्रावती : तालुक्यात अडीच हजार हेक्टरमध्ये प्रस्तावित असलेल्या वेकोलिच्या कोळसा खाणीला चालबर्डी (कों.) येथील ग्रामस्थांनी विरोध दर्शविला असून, चालबर्डी (कों.) येथे ग्रामस्थांची सुनावणी आक्षेप सभा नुकतीच आयोजित करण्यात आली.
ग्रामसभेचे अध्यक्ष म्हणून माजी सरपंच ज्ञानेश्वर मत्ते यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये कोंढा, हरदाळा खदान सुरू करण्याच्या बाबतच्या वेकोलिच्या अटी अमान्य करण्यात आल्या. याबाबतचा ठराव पारित करण्यात आला, तसेच ठरावाच्या प्रती जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना पाठविण्यात आल्या.
शेतजमीन विक्रीच्या व्हॅल्युएशनच्या विक्रीनुसार चारपट शेतीचा मोबदला, तसेच २५ वर्षांपर्यंत दरमहा ३० हजार रुपये मानधन व वार्षिक तीनशे रुपये वाढ देण्यात येईल, असे वेकोलितर्फे सांगण्यात आले होते. गावकऱ्यांनी ही बाब नामंजूर केली.
ग्रामपंचायतीला कुठलीही पूर्वसूचना लिखित न देता, कार्यालयीन प्रोसेसनुसार परिपत्रक न देता, प्रत्यक्ष गावात येऊन सुनावणी करण्यात आली. वास्तविक कायद्याच्या दृष्टीने हे चुकीचे आहे. त्यामुळे हे गावकऱ्यांनी नामंजूर केले.
भूमी अधिग्रहण हे कोणत्या वर्षीच्या कायद्यानुसार करण्यात येईल, हे सांगण्यात आले नाही. जमिनीची खरेदी- विक्री ही कोणामार्फत करण्यात येणार किंवा एमडीओमार्फत खाजगीकरणाद्वारे करण्यात येणार, हे सांगण्यात आले नसल्यामुळे गावकरी द्विधा मन:स्थितीत आहेत. जमिनीचा मोबदला म्हणून ५० लाख रुपये प्रतिएकर व प्रति सातबारा एक नोकरी देण्यात यावी, तरच वेकोलिला जमीन देण्यात येईल, असा ठराव सर्वानुमते पारित करण्यात आला.
याप्रसंगी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते. ज्या गावांमधील शेतजमीन या प्रकल्पामध्ये जाणार आहे, त्या गावांमधील ग्रामस्थसुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
याप्रसंगी ज्ञानेश्वर मते, सचिन उपरे, श्रीकांत मत्ते, सुनील दानव, पंढरी चावले, किशोर उपरे, श्यामराव उपरे, विकास उपरे, बंडू झाडे व ग्रामस्थ उपस्थित होते.