ग्रामस्थ हरले, मद्य जिंकले; दारू दुकानाच्या बाजुने पडली २४० पैकी तब्बल २२५ मते !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 12:12 PM2023-02-08T12:12:48+5:302023-02-08T12:23:47+5:30

नागरी ग्रामपंचायतची माहिती : दारू दुकानाला नाहरकत नियमानुसारच

Villagers lost, alcohol won; As many as 225 votes out of 240 on the liquor store side chandrapur | ग्रामस्थ हरले, मद्य जिंकले; दारू दुकानाच्या बाजुने पडली २४० पैकी तब्बल २२५ मते !

ग्रामस्थ हरले, मद्य जिंकले; दारू दुकानाच्या बाजुने पडली २४० पैकी तब्बल २२५ मते !

googlenewsNext

वरोरा (चंद्रपूर) : तालुक्यातील नागरी ग्रामपंचायतीने देशी दारू चिल्लर विक्री दुकानाला नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी आमसभेत घेतलेल्या निवडणुकीत उपस्थित २४० पैकी तब्बल २२५ जणांनी ठरावाच्या बाजूने आपला कौल दिला. त्यामुळे नाहरकत देण्याच्या कार्यवाहीत कोणताही गैरप्रकार झाला नसून, नियमाला धरून ग्रामसभा घेऊन ठराव घेण्यात आला आहे. याला काही ग्रामस्थांचा होत असलेला विरोध अनाकलनीय असून, तो राजकीय हेतूने प्रेरित तसेच गावातील अवैध देशी दारू विक्रीला प्रोत्साहन देणारा असल्याचा आरोप सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसभा अध्यक्षांनी केला आहे.

वरोरा तालुक्यातील नागरी ग्रामपंचायतकडे सीएल-३ देशी दारू चिल्लर विक्री दुकानाला ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यासाठी लक्ष्मी अशोक शेट्टी (राहणार भोईवाडा स्टेशन रोड, कल्याण, जिल्हा ठाणे) यांनी रीतसर अर्ज केला होता. त्या अर्जाच्या अनुषंगाने २० डिसेंबर २०२२ रोजी ग्रामसभेची नोटीस काढली. २९ डिसेंबर २०२२ ला सकाळी ११ वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, नागरीच्या प्रांगणात देशी दारू विक्री दुकानाला नाहरकत प्रमाणपत्र देणे, तांडा वस्ती घोषित करणे आणि तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत कामे प्रस्तावित व मंजूर करणे असे तीन विषय होते.

या ग्रामसभेला ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी यांच्यासह २४० ग्रामस्थ उपस्थित होते. या ग्रामसभेत सभा अध्यक्ष म्हणून दिलीप टिपले यांची निवड करण्यात आली. ग्रामविकास अधिकाऱ्यांनी विषय पटलावरील पहिला विषय नागरी येथे सीएल-३ देशी दारू विक्री दुकानाला नाहरकत प्रमाणपत्र देण्याबाबतचा वाचून दाखवत उपस्थित ग्रामस्थांची मते मागितली. तेव्हा २४० पैकी २२५ उपस्थितांनी ठरावाच्या बाजूने आपला कौल दिला. तर १५ ग्रामस्थांनी याला विरोध केला. यानंतर ग्रामविकास अधिकाऱ्यांनी दारू विक्री दुकानाला ना हरकत प्रमाणपत्र देण्याचा विषय २२५ विरुद्ध १५ मतांनी मंजूर झाला असल्याचे जाहीर करून तसा ठराव घेतला असल्याचे सरपंच प्रकाश बावने, उपसरपंच चंद्रशेखर मुजबैले, ग्रामसभा अध्यक्ष दिलीप टिपले, ग्रामविकास अधिकारी पांडुरंग पेंदे यांनी केले कळविले आहे.

अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करा

नागरी गाव परिसरात काही व्यक्ती देशी दारूची अवैध दारू विक्री करतात. ही दारू दुय्यम दर्जाची असून, ती चढ्या किमतीत विकली जात आहे. यामुळे मद्यपींच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होत असून, प्रसंगी एखाद्याचा जीव जाण्याची भीती आहे. त्यामुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Web Title: Villagers lost, alcohol won; As many as 225 votes out of 240 on the liquor store side chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.