सास्ती मंडळातील तलाठ्याच्या बदलीसाठी गावकरी पुढे सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:33 AM2021-08-17T04:33:28+5:302021-08-17T04:33:28+5:30
या सज्जात तलाठी मारोती अत्रे हे आल्यानंतर त्यांना साडेपाच वर्षांचा कालावधी होऊन गेला; मात्र कार्यालयात न बसण्याचा रेकॉर्ड त्यांनी ...
या सज्जात तलाठी मारोती अत्रे हे आल्यानंतर त्यांना साडेपाच वर्षांचा कालावधी होऊन गेला; मात्र कार्यालयात न बसण्याचा रेकॉर्ड त्यांनी केला आहे. ते कार्यालयात बसत नसल्याने शेतकऱ्यांना शेतीविषयक कामासाठी राजुराला जावे लागत आहे. तिथेही ते भेटत नाहीत. त्यांचा फोन नॉट रिचेबल असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, असे तक्रारीत म्हटले आहे.
येथील तलाठ्यांना शेतकऱ्याच्या कामाशी काहीही देणेघेणे नाही. आजपर्यंत अनेक गोरगरीब शेतकऱ्यांकडून हितसंबंधातूनच कामे केल्याचा आरोप परिसरातील शेतकरी उघडपणे करीत आहेत. अशा या तलाठ्यांची तत्काळ उचलबांगडी करावी, ही मागणी वारंवार शेतकरी करीत आले आहेत; मात्र प्रशासन याकडे कायम दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे त्रासून आंदोलनाच्या तयारीत असलेले शेतकरी आता चक्क विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडेही तक्रार केली आहे. याशिवाय परिसरातील शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी संपत खलाटे यांची भेट घेऊन तलाठ्याच्या बदलीची मागणी केली आहे.