ग्रामसभा बोलावून उमरवाही ग्रामस्थांनी घेतला दारूबंदीचा ठराव; अख्खे गाव एकवटले
By साईनाथ कुचनकार | Published: October 9, 2023 02:25 PM2023-10-09T14:25:56+5:302023-10-09T14:26:12+5:30
तरुण पिढीला वाचविण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार
चंद्रपूर : सिंदेवाही पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या उमरवाही येथे अवैध दारू तसेच अवैध धंदे सुरु आहे. यामुळे येथील नागरिकांसह महिला, मुले त्रस्त झाले आहे. दारुमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी ग्रामपंचायतने पुढाकार घेत ग्रामसभा बोलावली. या सभेमध्ये विविध ठराव पारित करण्यात आले. यामध्ये गावातील अवैध धंदे तसेच दारुबंदीचा ठराव पारित करण्यात आला.
गावातील परिस्थिती बदलण्यासाठी युवा पिढीला तसेच अनेकांचे संसार वाचविण्यासाठी सरपंच नीता बोरकर व पोलिस पाटील रागिनी मुंगमोडे यांनी पुढाकार घेत ग्रामसभा बोलावली. या सभेमध्ये विविध ठराव पारित करण्यात आले. या विशेष ग्रामसभेमध्ये महिला व पुरुषांनी व युवकांनी विशेष उपस्थिती लावली होती. ग्रामसभेला लावलेली उपस्थिती बघून अवैध दारू विक्रेत्यांचे मात्र धाबे दणाणले. अवैद्य दारू विक्रीवर जुगाराबद्दलचा ठराव गावाच्या साक्षीने सर्वानुमते संमत करण्यात आला. यानंतर गावात कुणी जुगार खेळणार नाही, दारू विकणार नाही, याबाबत जाहीर करण्यात आले.
गावातील सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ग्रामस्थांची
गावातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी व गावात तंटे होणार नाही याची काळजी घेण्याचे ग्रामसभेत ठरविण्यात आले. विशेष ग्रामसभेला सरपंच नीता बोरकर, पोलिस पाटील रागिनी मुंगमोडे, तंटामुक्त समिती अध्यक्ष परमानंद बोरकर, ग्रामपंचायत सचिव अतुल मेश्राम, ग्रामपंचायत सदस्य अशोक मसराम, राजीव मसराम, माजी सरपंच सदाशिव बोरकर, अंगणवाडी शिक्षिका, युवक महिला व नागरिक उपस्थित होते. तसेच विशेष उपस्थित म्हणून नवरगाव बिटचे बीट अंमलदार तसेच पोलिस उपस्थित होते.
परिसरामध्ये कौतुक
उमरवाही गावाने विशेष ग्रामसभा घेत गावातील अवैध धंदे तसेच दारुबंदी करण्यासंदर्भात ठराव पारित केला. या ठरावामुळे गावातील अवैध धंदे बंद होणार आहे. या ठरावाचे परिसरातील ग्रामस्थांनी कौतुक केले आहे. असाच ठराव प्रत्येक गावात घेतल्यास मोठा बदल होऊ शकतो.