कन्हाळगाव अभयारण्याला गावकऱ्यांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:53 AM2020-12-17T04:53:15+5:302020-12-17T04:53:15+5:30
चंद्रपूर : राज्य शासनाने नुकतेच कन्हाळगाव अभयारण्य म्हणून घोषणा केली. मात्र त्याचा परिणाम परिसरातील ३३ गावांवर पडणार असून त्यांचा ...
चंद्रपूर : राज्य शासनाने नुकतेच कन्हाळगाव अभयारण्य म्हणून घोषणा केली. मात्र त्याचा परिणाम परिसरातील ३३ गावांवर पडणार असून त्यांचा रोजगार हिरावण्याची भीती गावकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे हे कन्हारगाव अभयारण्य रद्द करण्यात यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
वनविकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील कन्हारगाव, झरण, धाबा, तोहोगाव वनक्षेत्राचा २६९ चौ. कि.मी क्षेत्र अभयारण्य करण्याची घोषणा राज्य शासनाने केली आहे. तालुक्यातील ४२ हजार १४४ लोकसंख्यांची ३३ गावे बाधित होणार आहेत. येथील २७०० ते २८०० मजूर जंगलाच्या कामावर अवलंबून आहेत. या परसिरातील शेतकरी, शेतमजूर व वनकामगार आणि जंगलापासून मिळणाऱ्या रोजगारावर अवलंबून असणाऱ्या मजुरांचा रोजगार प्रभावित होण्याची शक्यता आहे. तसेच पाळीव प्राण्यांना जंगलात चारईची समस्या निर्माण होणार आहे. त्यामुळे कन्हारगाव अभयारण्य रद्द करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव धिरज बांबोडे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी प्रमोद कातकर, गणेश चचाणे, विश्वनाथ मंडळ. हेमंत कुसराम, अमोल नसुरवार, सत्यावान जीवणे, अरुण धकाते, ज्ञानेश्वर मरस्कोल्हे, विनोद पोनलवार, संदीप जाधव, उत्तम मंडळ आदी उपस्थित होते.