रायपूर येथील ग्रामस्थ मदतीने सुखावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2017 11:30 PM2017-10-02T23:30:31+5:302017-10-02T23:30:55+5:30
रायपूर येथे जायला रस्ता नाही. शासनाच्या विविध योजनांपासून कोसो दूर असणाºया येथील ग्रामस्थांना नांदाफाटा येथील श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी धान्य व कपड्यांचे वाटप केल्याने गावकरी सुखावले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदाफाटा: रायपूर येथे जायला रस्ता नाही. शासनाच्या विविध योजनांपासून कोसो दूर असणाºया येथील ग्रामस्थांना नांदाफाटा येथील श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी धान्य व कपड्यांचे वाटप केल्याने गावकरी सुखावले.
रायूपर येथील जि.प. शाळेचे वर्ग आणि दोन-तीनच विद्यार्थी, केवळ एकच सिमेंट विटांच तुटकं घर आणि इतर १४ कुडाच्या घरांची वस्ती हे वास्तव आहे. कोलामक्रांती संघटनेचे संस्थापक विकास कुंभारे यांच्या प्रयत्नातून गावकºयांनी स्वातंत्र्यदिनाचा जल्लोष साजरा केला. नांदाफाटा येथील श्री शिवाजी इंग्लिश स्कूल ज्यु. कॉलेजच्या विद्यार्थ्यांना या गावातील परिस्थितीची जाणीव होताच सगळ्यांनी प्राचार्या आणि शिक्षकांसह खडकी गावाकडे धाव घेतली. तब्बल सहा किलोमीटर जंगलातून गावकºयांसह गावात विद्यार्थ्यांनी ग्रामस्वच्छता केली. घरुन आणलेले कपडे आणि धान्य गावकºयांना वाटप केले. सोबतच कोलगेट, ब्रश, साबण, तेल तथा गोड पदार्थही गावकºयांना भेट म्हणून दिल्या. ग्रामस्थांचे हाल पाहून विद्यार्थीही गहिवरले. येथील नागरिकांना पायी चालत जाऊन नगराळा अथवा बेलगाव येथून बस पकडावी लागते. शासनाच्या कोणत्याही योजना गावात पोहोचल्या नाहीत. आर्थिक व सामाजिकदृष्ट्या या गावाचा अद्याप विकास न झाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.
बैलगाडीवर बसवून रुग्ण जातात बाहेरगावी
रुग्णांना उपचारासाठी न्यायचे असल्यास बैलगाडीशिवाय कुठलाच पर्याय नाही. ग्रामस्थांना तीन किलोमीटर पायी प्रवास करावा लागतो. जिवती किंवा गडचांदूर येथे जाण्यासाठी सुविधाच नाही. त्यामुळे पावसाळ्यात अनेक संकटांचा सामना करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे.