गावकऱ्यांनी सात तास कोळसा वाहतूक रोखली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:28 AM2021-09-03T04:28:29+5:302021-09-03T04:28:29+5:30
ओव्हरलोड कोळसा वाहतूक बंद करा : ढोल-ताशे वाजवून नागरिकांनी केले मुंडन गोवरी : कोळसा खाणीतील ओव्हरलोड वाहतुकीमुळे गोवरी-पोवनी-साखरी रस्त्याची ...
ओव्हरलोड कोळसा वाहतूक बंद करा : ढोल-ताशे वाजवून नागरिकांनी केले मुंडन
गोवरी : कोळसा खाणीतील ओव्हरलोड वाहतुकीमुळे गोवरी-पोवनी-साखरी रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. दिवसेंदिवस कोळशाची ओव्हरलोड वाहतूक जीवघेणी ठरत असल्याने परिसरातील गावकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. दररोज वेकोलीतून कोळशाची नियमबाह्य ओव्हरलोड वाहतूक सुरू आहे. या विरोधात माजी ग्रामपंचायत सदस्य भास्कर जुनघरी यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी गोवरी येथील मुख्य मार्गावर गावकऱ्यांनी वेकोलिची ओव्हरलोड कोळसा वाहतूक रोखून धरली.
यावेळी ओबीसी विभागाचे सरचिटणीस उमाकांत धांडे, सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल कावळे, उपसरपंच उमेश मिलमिले, हरिश्चंद्र जुनघरी, ग्रामपंचायत सदस्य चेतन बोभाटे व गावकऱ्यांनी वेकोलि प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. जोपर्यंत वेकोली गावकऱ्यांच्या मागण्या मान्य करणार नाही, तोपर्यंत आंदोलन पुन्हा तीव्र करू, असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतल्याने काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
सकाळी ६ वाजतापासून गोवरी, पोवनी व साखरी येथील नागरिकांनी सात तास वाहतूक रोखून धरली. त्यामुळे वेकोलि प्रशासन खडबडून जागे झाले. गोवरी डीप कोळसा खाणींचे सब एरिया मॅनेजर जी.व्ही. एस.प्रसाद यांनी गावकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत साखरे व पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता.
बॉक्स
नागरिकांनी केले मुंडण
ढोल ताशाच्या गजरात नागरिकांनी गोवरी-पोवनी मुख्य मार्गावर चक्काजाम केले. वेकोलि प्रशासनाच्या निषेधार्थ नागरिकांनी मुंडन करून जाहीर निषेध नोंदविला.
020921\img_20210902_150920.jpg
ओव्हरलोड कोळसा वाहतूक विरोधात गोवरी वासियांनी केले चक्काजाम आंदोलन