तालुक्यातील गावपुढाऱ्यांना बनविले मूर्ख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 11:53 PM2019-06-22T23:53:27+5:302019-06-22T23:57:41+5:30
स्थानिक स्वराज्य संस्थेत ग्रामपंचायतीला महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे गावातील पुढारी म्हणजेच सरपंचाला मान असतो. कौंटुंबिक व सामाजिक कामात त्यांचे मार्गदर्शन घेण्यात येते. मात्र चिमूर तालुक्यातील ३० ते ४० सरपंचांना खास तुमच्याकरिता खरेदी योजना असल्याची बतावणी करुन सुलभ हप्त्याच्या नावाने आगाऊ रक्कम जमा करून फसवणूक करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : स्थानिक स्वराज्य संस्थेत ग्रामपंचायतीला महत्त्वाचे स्थान आहे. त्यामुळे गावातील पुढारी म्हणजेच सरपंचाला मान असतो. कौंटुंबिक व सामाजिक कामात त्यांचे मार्गदर्शन घेण्यात येते. मात्र चिमूर तालुक्यातील ३० ते ४० सरपंचांना खास तुमच्याकरिता खरेदी योजना असल्याची बतावणी करुन सुलभ हप्त्याच्या नावाने आगाऊ रक्कम जमा करून फसवणूक करण्यात आली. दिलेल्या मुदतीत वस्तु न मिळाल्याने दिलेल्या पत्त्यानुसार चौकशी करण्यात आली . या नावाचे दुकानच नसल्याने तालुक्यातील गाव पुढाऱ्यांना मुर्ख बनविल्याचे सिद्ध झाले.
आजच्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात वस्तु व सेवा विक्रीकरिता सुलभ हप्ता पद्धती मोठया प्रमाणात राबविण्यात येत आहे. त्यामुळे आपल्या आवडीच्या, गरजेच्या व चैनीच्या वस्तू, जागा किंवा घर मध्यमवर्गियांच्या आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यात आलेल्या आहेत. अशा प्रकारे वस्तु विनिमय पद्धतीमध्ये सुलभ हप्ता पद्धतीचा वापर सर्रास होत असल्याने अनेक भामटे व लुबाडणुक करणारे अस्तित्वात नसलेल्या कंपनी किंवा पेढीच्या नावाने फसविण्याचे प्रमाणसुद्धा वाढलेले आहे. ज्यामुळे अनेक सुशिक्षीत महिला-पुरूष याला बळी पडत आहेत. खास व्यक्तीकरिता किंवा काही अल्प कालावधीकरिता ही योजना सुरू असल्याचे सांगून मोठया प्रमाणात फसवणूक केली जात आहे.
चिमूर तालुक्यामध्ये सुद्धा असाच प्रकार घडला आहे.
तालुक्यातील ३० ते ४० सरपंचांकडे खालसा स्टिल रेलिंग, महाकाली मंदिर, चंद्रपूर येथे दुकान असल्याचे सांगून कंपनीने खास चंद्रपूर जिल्ह्यातील सरपंचाकरिता सुलभ हप्त्यामध्ये विविध वस्तु बुकिंग केल्यास व वस्तुच्या एकूण रकमेपैकी अर्धी रक्कम भरल्यास आठ दिवसात वस्तू देण्यात येईल. तसेच उर्वरित रक्कम प्रत्येक महिन्याला पाचशे रुपये या प्रमाणे सुलभ हप्त्यात घेण्यात येईल असे सुरेंद्रसिंग नावाच्या व्यक्तीने सांगितले. अंदाजे ३० ते ४० सरपंचानी अॅडव्हान्स रक्कम दिल्या व वस्तुंची बुकींग केली.
बुकींग झाल्यानंतर सांगितल्याप्रमाणे मुदतीत वस्तु प्राप्त न झाल्याने अनेकांनी याबाबत विचारणा करण्यासाठी पावतीमधील भ्रमणध्वनी क्रंमाकावर फोन केल्यानंतर फोन लागतच नव्हता. त्यामुळे ज्यांनी वस्तु बुकिंग केल्या, त्यांनी एकमेकांसोबत संपर्क साधून वस्तु प्राप्त झाल्या काय, याविषयी विचारपूस केली . मात्र कोणलाच वस्तु मिळाल्या नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर पाच सरपंच संबंधित दुकानात गेले असता गेले असता महाकाली परिसरात सदर दुकानच नसल्याचे निदर्शनास आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच खालसा स्टिल रेलिंग चे प्रो . प्रा . सुरेंद्रसिंग यांच्या विरोधात खापरी(धर्मु)चे सरपंच प्रकाश मेश्राम, मदनापूरच्या सरपंच सुरेखा दोडके, मासळच्या सरपंच कल्पना गणवीर, तळोधी (नाईक) च्या सरपंच पार्वता किन्नाके, साताराच्या सरपंच सुरेखा कोयचाडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे.
सुलभ हप्त्याच्या नावाखाली केली फसवणूक
खास सरपंचाकरिता सुलभ हप्त्यात वस्तु विक्रीची योजना असल्याचे सांगून तालुक्यातील सरपंचांना खालसा स्टिल रेलींगच्या नावावर आमची फसवणूक झाली असून या नावाचे दुकानच नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे फसवणुकीची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे केली आहे. तालुक्यातून याप्रकारे फसवणूक झालेल्यांची संख्या ३० ते ४० आहे.
-प्रकाश मेश्राम
सरपंच, खापरी (धर्मु).