गावे महाराष्ट्राची; विकास कामे तेलंगणची
By Admin | Published: May 11, 2017 12:35 AM2017-05-11T00:35:02+5:302017-05-11T00:35:02+5:30
चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या जिवती तालुक्यातील तेलंगणा - महाराष्ट्र सीमेवरील ते १४ वादग्रस्त गावे महाराष्ट्राचीच आहे,...
नागपूर खंडपीठाचा निर्णय : वादग्रस्त १४ गावे महाराष्ट्राचीच
फारुख शेख । लोकमत न्यूज नेटवर्क
पाटण : चंद्रपूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या जिवती तालुक्यातील तेलंगणा - महाराष्ट्र सीमेवरील ते १४ वादग्रस्त गावे महाराष्ट्राचीच आहे, असा निर्णय नागपूर- खंडपीठाने दिला. असे असतानाही या गावात तेलंगणा सरकारने विकास कामांचा सपाटा सुरु केला आहे.
जिवती तालुक्याच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या वादग्रस्त गावापैकी एक आहे पुडियाल मोहदा. या गावाची लोकसंख्या ४०० आहे. येथे शासकीय विहीर एक, बोअरवेल एक आहे. बोअरवेल बंद अवस्थेत असून विहीरही कोरडी पडली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गावापासून तालुका मुख्यालय १६ किमी तर तेलंगणातील मंडळ केरामेरी २० किमी अंतरावर आहे. गावात आतापर्यंत एसटी पोहचलेली नाही. गावात विद्युत खांब टाकून तीन ते चार वर्ष लोटले असून विद्युत पुरवठा अजूनही सुरू झालेला नाही. उलट या गावात तेलंगणा राज्यातील विद्युत पुरवठा चालू आहे.
१४ वादग्रस्त गावे ही महाराष्ट्राची असूनही शासनाने दुर्लक्ष केले आहे तर तेलंगणा राज्याने मात्र विकास कामाचा सपाटा सुरू केला आहे. या गावांची मुख्य समस्या पिण्याचे पाणी आहे. तेलंगणा शासन तीन कोटी खर्चून पाण्याची टाकी उभारत आहे. यामुळे भोलापठार, अंतापूर, इंदिरानगर, पद्मावती, रोझापूर, नारायणगुडा या गावांना पाणी मिळणार आहे. मात्र येथील नागरिकांना महाराष्ट्रातच राहायचे असल्याने त्यांना महाराष्ट्र सरकारच्या योजना व विकास कामे हवी आहेत.
दरम्यान, पुडियाल मोहदा ग्रामपंचायतीच्या सदस्य लक्ष्मीबाई बाबूजी कोटुले, वाघुजी कोंडीबा कोटुळे, शामराव भुरकुटे, सखाराम मिरासे, मारोती कोटुळे यांनी आम्हाला महाराष्ट्रातच राहायचे असून पिण्याचे पाणी, विद्युत मीटरसाठी जिवती येथील संवर्ग विकास अधिकाऱ्यांशी वेळोवेळी पत्रव्यवहार केला आहे. मात्र कोणताच अधिकारी व नेते गावात आलेले नाही, अशी प्रतिक्रिया ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.