कोरोना नियमांचे उल्लंघन; ४० लाखांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:19 AM2021-06-21T04:19:34+5:302021-06-21T04:19:34+5:30
जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्ण आढळून आले. यामध्ये अनेकांचा मृत्यूही झाला. त्यामुळे शासनाने कठोर नियम करीत लॉकडाऊन सुरू ...
जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्ण आढळून आले. यामध्ये अनेकांचा मृत्यूही झाला. त्यामुळे शासनाने कठोर नियम करीत लॉकडाऊन सुरू केले होते. लॉकडाऊन काळात वाहतूक शाखेच्या वतीने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत होती. यासाठी चौकाचौकात पोलिसांचे नाके लावण्यात आले होते. यामध्ये विनाकारण घराबाहेर पडणे, विनामास्क फिरणे, विनाहेल्मेट, ट्रिपल सिट, फॅन्सी नंबर, सिग्नल तोडणे यासह मोटर वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उचलण्यात आला. १५ एप्रिल २०२१ ते ६ जून २०२१ या दोन महिन्यांच्या कालावधीत तब्बल ३९ लाख ४५ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
बॉक्स
चंद्रपूर सर्कलमध्ये सर्वाधिक कारवाई
चंद्रपूर सर्कलअंतर्गत येणाऱ्या बल्लारपूर, शहर, रामनगर, पडोली, दुर्गापूर, घुग्घुस पोलीस स्टेशनअंतर्गत ८२८४ जणांवर कारवाई करून १९ लाख १७ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यामध्ये चंद्रपूर सीटी टीआर पोलिसांनी सर्वाधिक ३६८५ जणांवर कारवाई करीत आठ लाख ८७ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल केला.
-----
विनामास्क फिरणे भोवले
कोरोनामुळे विनामास्क फिरणाऱ्यावर बंदी घातली होती. मात्र अनेकजण विनामास्क फिरत होते. अशांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला होता. जिल्ह्याभरातच पोलिसांकडून ही मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत पोलिसांनी अनेकांवर कारवाई करीत लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मनपा, नगरपरिषद, नगरपंचायत, ग्रामपंचायत आदी विभागातर्फेही विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
---------
कोरोनामुळे मास्क घालूनच फिरावे, विनाकारण फिरू नये, असे निर्देश असतानाही अनेकजण विनाकारण फिरत असतात, तर बहुतेकजण वाहतूक नियमांचे उल्लंघन करतात. अशांवर वाहतूक विभागातर्फे कारवाई करण्यात येते. कोरोनाचे रुग्ण कमी झाले असले तरी कोरोना अद्याप गेलेला नाही. त्यामुळे मास्क घालूनच बाहेर पडावे.
- हृदयनारायण यादव, वाहतूक पोलीस निरीक्षक, चंद्रपूर