प्रवासी वाहनातून नियमांचे उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:26 AM2021-07-26T04:26:32+5:302021-07-26T04:26:32+5:30
घोसरी : पोंभुर्णा तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनातील प्रवासी विनामास्क सर्रासपणे ये-जा करीत आहे. याकडे मात्र पोलिसांचे दुर्लक्ष ...
घोसरी : पोंभुर्णा तालुक्यात अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनातील प्रवासी विनामास्क सर्रासपणे ये-जा करीत आहे. याकडे मात्र पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. पोंभुर्णा तालुक्यातील नांदगाव-गोंडपिपरी, पोंभुर्णा-चंद्रपूर मार्गावर हा प्रकार सुरू आहे.
वढोलीत पांदण रस्त्याची दैनावस्था
वढोली : बोरगाव पुलाकडून निघणारा ताराचंद कोपुलवार ते विश्वनाथ चुदरी यांच्या शेतापर्यंत जाणाऱ्या पांदन रस्त्यावर खड्डेमय परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे चिखलाचे साम्राज्य व मोठे खड्डे तयार झाले असून, आवागमन करणाऱ्यांना त्रास होत आहे.
ओपन स्पेस बनले कचऱ्याचे केंद्र
चंद्रपूर : प्रत्येक वॉर्डात ओपन स्पेस तयार करून, संरक्षक भिंती बांधण्यात आल्या. काही ठिकाणी लोखंडी गेट उभारण्यात आले. मात्र, या ओपन स्पेसवर नियंत्रण न ठेवल्याने कचरा टाकला जात आहे. याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
रस्त्यावरच केली जाते भाजी विक्री
चंद्रपूर : कोरोनाचे सावट असल्यामुळे बाजारपेठ सकाळी ११ वाजेपर्यंतच सुरू राहत आहे. त्यामुळे काही छोटे व्यावसायिक जागा मिळेल, त्या ठिकाणी बसून भाजीपाला विकून आपला उदरनिर्वाह करीत आहे. विशेष म्हणजे, रामनगर, तसेच वडगाव परिसरामध्ये रस्त्याच्या कडेलाच बसून भाजी विक्रेते भाजी विकत आहेत.
महिला गृहोद्योग मंडळातर्फे गृहिणींचा सन्मान
गडचांदूर : येथील ग्रामीण रुग्णालय व नगरपरिषद या ठिकाणी कोविड १९ या काळात सहकार्य करणाऱ्या गृहिणींचा ग्रामीण भारत महिला गृहोद्याेग मंडळातर्फे सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी प्रामुख्याने नगराध्यक्ष सविता टेकाम, सभापती निमजे, एकनाथराव कन्नाके, अशोकराव अंबागडे, डॉ.देव कन्नाके, डॉ.मनीषा कन्नाके, डॉ.श्वेता दिवे, विवेक कांबळे, सौरभ मादासवार, प्रशील भेसेकर, किसन बोबडे, ईर्शाद शेख, जुमनाके यांच्या हस्ते गृहिणींचा सत्कार करण्यात आला.
कृषी विभागातील निम्मी पदे रिक्त
चंद्रपूर : तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील मंजूर पदांपैकी अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्यास अडचण जात आहे. परिणामी, शेतकरी अद्यापही परंपरिक पद्धतीनेच शेती करीत असल्याचे दिसून येत आहे. पदे भरण्याची मागणी आहे.
लाभ मिळण्यास दिरंगाई
चंद्रपूर : गर्भवती व प्रसूत झालेल्या मातांना आर्थिकदृष्ट्या दिलासा देण्यासाठी शासनाच्या वतीने जननी शिशू सुरक्षा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्याच्या दुर्गम भागात कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत शस्त्रक्रिया केल्यानंतरही अनुदान मिळत नाही.
खासगी शिक्षकांची चिंता वाढली
चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या संख्येने इंग्रजी शाळा आहे. या शाळांमध्ये मोठ्या संख्येने कंत्राटी पद्धतीने शिक्षक शिकविण्यासाठी जातात. मात्र, मागील वर्षी कोरोनामुळे या शिक्षकांना मोठा फटका बसला. या वर्षी तिच स्थिती आहे.
कल्पतरूत गुणवंतांचा गुणगौरव
सिंदेवाही : कल्पतरू विद्यामंदिर कॉन्व्हेंटमध्ये प्रथम मैथिली नीमगडे, द्वितीय पौर्णिमा पर्व, तृतीय पूजा पर्वते, साक्षी बन्सोड यांचा गुणगौरव संचालक धनंजय बळवंत बन्सोड, प्राचार्य शेख, मुल्लेवार, धनविजय यांच्या हस्ते केला.
गोंडवाना ग्रुपतर्फे डोंगरगाव येथे वृक्षारोपण
राजोली : डोंगरगाव येथील गोंडवाना ग्रुपच्या वतीने नुकतेच वृक्षारोपण करण्यात आले. मधुकर मेश्राम यांच्या संकल्पनेनुसार डोंगरगाव ते रत्नापूर या रस्त्याच्या दुतर्फा निलगिरी या वनौषधीचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी राजोलीचे सरपंच जितेंद्र लोणारे, डोंगरगाव सरपंच शिल्पाताई भोयर, ग्रामपंचायत सदस्य नामदेव खोब्रागडे, स्वप्निल टिकले, हनवते, गोंडवाना ग्रुपचे सदस्य गोलुभाऊ गेडाम, खुशाल सोयम, छोटू पेटकर, उमेश कांबळे व सूरज बहिरवार यांची प्रमुख उपस्थिती होती.