कोविड नियमांचे उल्लंघन करणे व्यापाऱ्यांना भोवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:26 AM2021-04-13T04:26:49+5:302021-04-13T04:26:49+5:30
चंद्रपूर : शासनाने आखून दिलेल्या कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्या चंद्रपुरातील व्यावसायिकांवर महापालिका प्रशासनाने कारवाई करीत त्यांच्याकडून प्रत्येकी पाच ...
चंद्रपूर : शासनाने आखून दिलेल्या कोरोना नियमांचे पालन न करणाऱ्या चंद्रपुरातील व्यावसायिकांवर महापालिका प्रशासनाने कारवाई करीत त्यांच्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
यामध्ये श्री संताजी जगनाडे महाराज वसतिगृह, सिटी मोबाइल शॉपी, गोपाल ट्रेडींग कंपनी, पाकिजा शॉपी, फॅशन क्वीन या प्रतिष्ठानांवर चंद्रपूर महानगरपालिका प्रशासनाने कारवाई केली.
मनपा पथकामार्फत झोन क्र. १ अंतर्गत पाहणी सुरू असताना गोल बाजार, गांधी चौक ते जटपुरा रस्त्यावरील चार दुकाने सुरू असल्याचे निदर्शनास आले. यामुळे दुकान मालकास प्रत्येकी पाच हजार रुपये दंड ठोठावून दुकान बंद करण्यास सांगण्यात आले. झोन क्र. ३ अंतर्गत पाहणी सुरू असताना श्री संताजी जगनाडे महाराज वसतिगृहात लग्न कार्य सुरू असल्याचे आढळून आले. या लग्न कार्यात ५० पेक्षा जास्त नागरिक असल्याचे निदर्शनास आल्याने श्री संताजी जगनाडे महाराज वसतिगृहाचे व्यवस्थापकास पाच हजार रुपये दंड करण्यात आला.
कोरोना बाधितांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून वाढ होत आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिक काळजीपूर्वक व काटेकोर लक्ष देण्याची गरज असून, यामध्ये कोणत्याही प्रकारचे दुर्लक्ष धोकादायक ठरू शकते. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. ही कारवाई सहायक आयुक्त धनंजय सरनाईक, विद्या पाटील, सुरक्षा अधिकारी राहुल पंचबुद्धे यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी केली.