एसटीचे सीमोल्लंघन, प्रवासी मात्र घरातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:19 AM2021-07-09T04:19:10+5:302021-07-09T04:19:10+5:30
चंद्रपूर : मागील दीड वर्षापासून कोरोना संकटामुळे एसटीला मोठा आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. असे असले तरी दुसऱ्या ...
चंद्रपूर : मागील दीड वर्षापासून कोरोना संकटामुळे एसटीला मोठा आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. असे असले तरी दुसऱ्या लाॅकडाऊननंतर पुन्हा एसटी प्रवाशांच्या सेवेसाठी धावत असून आता तर परराज्यातही एसटीने आपल्या फेऱ्या सुरू केल्या आहे. मात्र आताही पाहिजे तसे प्रवासी मिळत नसल्याची स्थिती आहे.
मागील वर्षी लाॅकडाऊन सुरू झाल्यानंतर एसटीची चाके आगारात रुतून होती. हळूहळू शिथिलता मिळताच एसटी रस्त्यावर आली. मात्र प्रवासी नसल्याने बहुतांश मार्गावर ती धावलीच नाही. दरम्यान यावर्षी पुन्हा लाॅकडाऊन करण्यात आला. यावेळी मात्र काही मार्गावर एसटीच्या मोजक्याच फेऱ्या सुरू आहे. आता कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने राज्य सरकारने शिथिलता दिली आहे. त्यामुळे एसटीनेही पूर्ण क्षमतेने मार्गावर धावणे सुरू केले असून परराज्यातही प्रवास सुरू केला आहे. मात्र पाहिजे तसे प्रवासी मिळत नसल्याने आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
बाॅक्स
जिल्ह्यातील एकूण आगार -०४
जिल्ह्यातील एकूण बसेस -२४५
सध्या सुरू असलेल्या बसेस -१९२
रोज एकूण फेऱ्या-६०८
दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या बसेस-६०८
-बाॅक्स
पुन्हा तोटा वाढला
मागील वर्षीपासून एसटी महामंडळाला सतत तोटा सहन करावा लागला. त्यातच यावर्षी पुन्हा लाॅकडाऊनमध्ये मोठा आर्थिक फटका बसला. यावर पर्याय म्हणून एसटीने मालवाहतूकही सुरू केली. मात्र अद्यापही महामंडळाची आर्थिक घडी विस्कटलेलीच आहे.
बाॅक्स
दुसऱ्या राज्यातील बसेसला प्रवासी मिळेना
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्या अधिक होती. मृत्युदरही वाढला. परिणामी नागरिकांना घराबाहेर पडण्यावर निर्बंध होते. त्यातच आजही भीती कायम असल्यामुळे कामाशिवाय नागरिक इतर कुठेही जात नाही. प्रवासी मिळत नसल्यामुळे एसटीला तोटा सहन करावा लागत आहे.
बाॅक्स
अनेक मार्गावरील फेऱ्या बंदच
दुसऱ्या लाॅकडाऊननंतर एसटीच्या काही फेऱ्या बंद करण्यात आल्या होत्या. आता काही मार्गावर पूर्ववत फेऱ्या सुरू आहे. मात्र अद्यापही ग्रामीण भागातील फेऱ्या बंद आहेत. त्यातच प्रवासी मिळत नसलेल्या काही भागातील फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत.
बाॅक्स
नागपूर, गडचिरोली मार्गावर गर्दी
जिल्ह्यातील इतर मार्गाच्या तुलनेमध्ये नागपूर तसेच गडचिरोली मार्गावरील बसमध्ये गर्दी बघायला मिळत आहे. चंद्रपूर-नागपूर मार्गावर एसटीच्या दिवसभर अनेक फेऱ्या आहे. मात्र नागपूरला जाणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने नेहमीच गर्दी राहते. तसेच गडचिरोली मार्गावर अन्य वाहनांचा अभाव असल्यामुळे या मार्गावरही एसटीला मोठ्या प्रमाणात प्रवासी मिळत आहेत.