बल्लारपूरचा ‘व्हीआयपी कोटा’ नागपूरला
By admin | Published: November 23, 2015 12:51 AM2015-11-23T00:51:42+5:302015-11-23T00:51:42+5:30
बल्लारपूरचे रेल्वेस्थानक राज्याची सीमा बदलणारे आहे. दक्षिण व उत्तर आणि पूर्व-पश्चिम रेल्वेचे जंक्शन येथे आहे.
रेल्वे प्रशासनाची करामत : प्रवाशांना सहन करावी लागते गैरसोय
अनेकश्वर मेश्राम बल्लारपूर
बल्लारपूरचे रेल्वेस्थानक राज्याची सीमा बदलणारे आहे. दक्षिण व उत्तर आणि पूर्व-पश्चिम रेल्वेचे जंक्शन येथे आहे. वर्षाला कोट्यवधींचा महसूल देणाऱ्या बल्लारशाह रेल्वेस्थानकाला १२ प्रवाशांसाठी ‘व्हीआयपी कोटा’ मंजूर होता. मात्र रेल्वे प्रशासनाने करामत करून बल्लारपूरचा ‘व्हीआयपी बर्थ कोटा’ नागपूरला पळविल्याची माहिती आहे. त्यामुळे प्रवाशांकडून आश्चर्य व्यक्त केल्या जात असून नाराजीचा सूर उमटू लागले आहे.
बल्लारपूर औद्योगिक शहर असून जागतिक दर्जाचा कागद उद्योग येथे आहे. सागवन लाकडाचे आगार, वेकोलिच्या कोळसा खाणी, गोंडकालीन ऐतिहासिक किल्ला, पर्यटकांना खुणवणारे वने आहेत. रेल्वेच्या जाळ्यामुळे शहर दक्षिण भारताला जोडले आहे. येथील रेल्वे स्थानकावरुन सरळ रेल्वे सेवा दिल्ली-चेन्नईला जोडली आहे. राज्याची राजधानी मुंबईसाठी ‘लिंक रेल्वे एक्स्प्रेस’ सोडण्यात येते. परिणामी रेल्वे प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
येथील रेल्वे स्थानकावरुन प्रवास करताना मान्यवर व मोठ्या हुद्याच्या व्यक्तींना सुकर प्रवास घडावा म्हणून रेल्वे प्रशासनाने १२ मान्यवरांसाठी ‘व्हीआयपी बर्थ कोटा’ आरक्षित केला होता. मात्र ध्यानीमनी नसताना रेल्वे मंत्रालयाने येथील सदर कोटा नागपूर येथील रेल्वेस्थानकाला जोडल्याची माहिती विश्वसनीय सुत्रानी दिली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारशाह रेल्वे स्थानकाची महती दूरवर पसरली आहे. केंद्र सरकारमध्ये जिल्ह्याचे खासदार हंसराज अहीर राज्यमंत्री आहेत. बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार राज्याच्या मंत्रिमंडळात महत्त्वपूर्ण तीन खात्याचे मंत्री असताना येथील ‘व्हीआयपी बर्थ कोटा’ वगळण्यात का आला, याची विचारणा होत आहे.
बल्लारशाह रेल्वे स्थानक महान व थोर व्यक्तींच्या पदस्पर्शाने पवित्र झाले आहे. येथून शेकडोंवर लांब पल्याच्या प्रवाशी गाड्या दररोज धावत असतात. जिल्ह्यातील महत्त्वाचे रेल्वे स्थानक असताना येथील ‘व्हीआयपी बर्थ कोटा’ नागपूरला वळती करण्याचे कारण रेल्वे प्रशासनाने का घेतले, याचा उलगडा होणे क्रमप्राप्त आहे. अलीकडेच येथील रेल्वे स्थानकाला मॉडेल दर्जा देण्याचे रेल्वे प्रशासनाने सुतोवाच केले आहे. असे असताना ‘व्हीआयपी’ कोट्याला कात्री का लावण्यात आली, याचा सोक्षमोक्ष रेल्वे प्रशासनाने लावण्याची गरज आहे. येथील ‘व्हीआयपी बर्थ कोटा’ पूर्ववत सुरू राहण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असून बल्लारशाह रेल्वे स्थानकाचे अधोरेखित असलेले महत्त्व कायम ठेवण्याची मागणी आहे.
बल्लारशाह रेल्वेस्थानक मध्यवर्ती आहे. यामुळे याला अनन्य साधारण महत्त्व आहे. रेल्वेचा ‘व्हीआयपी बर्थ कोटा’ सुरू आहे. मात्र डीआरएम नागपूर कार्यालयाकडे येथील अधिकारी सदर कोट्याचा पाठपुरावा करीत नाही. लांब पल्ल्याच्या दिल्ली, चेन्नई, मुंबई, विजयवाडा रेल्वेसाठी डीआरएम कार्यालयाकडून ‘व्हीआयपी बर्थ कोटा’ प्राप्त करण्यासाठी मान्यता घ्यावी लागते. या संदर्भात बल्लारशाह रेल्वे स्थानकाचे अधीक्षक यांची विचारणा करून रेल्वे प्रशासनाच्या जीआरची माहिती मागणार आहे.
- श्रीनिवास सुंचूवार
अध्यक्ष जिल्हा रेल्वे प्रवाशी संघ, बल्लारपूर