वायरल फिवरने नागरिक हैरान
By Admin | Published: July 24, 2016 12:42 AM2016-07-24T00:42:39+5:302016-07-24T00:42:39+5:30
पावसाची रिपरिप, गावागावात घाणीचे साम्राज्य आणि डासांचा वाढलेला प्रकोप, यामुळे जिल्ह्यात तापाच्या रुग्णात कमालीची वाढ झाली आहे.
चंद्रपूर : पावसाची रिपरिप, गावागावात घाणीचे साम्राज्य आणि डासांचा वाढलेला प्रकोप, यामुळे जिल्ह्यात तापाच्या रुग्णात कमालीची वाढ झाली आहे. प्रत्येक गावात तापाचे रुग्ण आढळून येत आहेत. या वायरल फिवरने जिल्हावासी हैरान झाले आहेत. ग्रामीण भागात आरोग्य केंद्रात सोई-सुविधांचा अभाव असल्याने रुग्णांना नाईलाजाने खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. यामुळे रुग्णांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. पावसामुळे गावागावात रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. केरकचरा, डम्पींग यार्ड, खताचे ढिगारे यामध्ये सततच्या पावसामुळे घाणीचे साम्राज्य वाढले आहे. परिणामी डासांचाही प्रकोप वाढला आहे. त्यामुळे गावागावात तापाच्या रुग्णात कमालीची वाढ झाली आहे. जिल्ह्यातील चंद्रपूरसह वरोरा, राजुरा, बल्लारपूर, जिवती, कोरपना, भद्रावती, सिंदेवाही, मूल, नागभीड, ब्रह्मपुरी आदी तालुक्यातही तापाची साथ पसरली आहे.
अनेक गावात एका कुटुंबातील दोन- तीन रुग्ण खाटेवर खिळून पडले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने डोके दुखी, सांधे दुखी, मलेरिया, सर्दी पडसे अशी लक्षणे गावकऱ्यात दिसून येत आहे. गावागावातील नागरिक तापाच्या साथीने हैरान असताना आरोग्य विभाग सुस्त बसल्याचे दिसून येत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने आरोग्य यंत्रणेने सर्तक राहणे आवश्यक आहे. परंतु अनेक तालुक्यातील ग्रामीण आरोग्य उपकेंद्रात सोईसुविधांचा अभाव दिसून येत आहे. गोरगरीब रुग्णांना नाईलाजाने खासगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागत आहे. रुग्ण खासगी दवाखान्यात जावून उपचार घेत असल्याने त्यांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागात सध्या शेतकऱ्यांचा हंगाम सुरू आहे. पेरण्या टाकून शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त आहेत. शेतमजूरही कामाला लागले आहेत. मात्र मध्येच वायरल फिवरने थैमान घातल्याने शेतकरी व शेतमजुरांना तापामुळे ऐन कामाच्या वेळी घरी बसून रहावे लागत आहे.
आरोग्य यंत्रणेने गावागावात आपले पथक पाठवून रुग्णांची तपासणी करावी व आवश्यक त्या ठिकाणी आपले शिबिर लावण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)
गोवरी येथे तांडव
राजुरा तालुक्यातील गोवरी येथे गेल्या चार- पाच दिवसांपासून वायरल फिवरने थैमान घातले आहे. ५० हुन अधिक रुग्ण खाटेवर तापाने फणफणत आहे. गावात स्थानिक आरोग्य उपकेंद्र आहे. या उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या गोवरी,साखरी, पोवनी, हिरापूर, चिंचोली, गोवरी कॉलनी या गावांचा भार शेरकी नामक एका आरोग्य सेविकेवर आहे. या गावात सेवा देताना आरोग्य उपकेंद्र बंद ठेवावे लागत असल्याने रुग्णांना आल्यापावली आरोग्य उपकेंद्राच्या गेटवरुनच परत जावे लागत आहे. गोवरी येथील मलेरिया वर्कर मोरे यांची गेल्या १५ दिवसांपूर्वी बदली झाली. परंतु त्या ठिकाणी दुसऱ्या कोणाचीही नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे सहा गावांचा डोलारा एका आरोग्य सेविकेला सांभाळावा लागत आहे.
काही दिवसांपासून तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालयांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या डेंग्यू व मलेरियाचे प्रमाण नाही. पुढेही त्याचा प्रकोप होऊ नये म्हणून नागरिकांनी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा.
-डॉ. पी.एम. मुरंबीकर,
जिल्हा शल्य चिकित्सक, चंद्रपूर.
जिल्हा सामान्य रुग्णालयात गर्दी
चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात मागील आठवड्यापासून रुग्णांची गर्दी झालेली दिसून येत आहे. आधीच्या तुलनेत सध्या येथील ओपीडीमध्ये १०० ते १५० रुग्णांची वाढ झाली आहे. या रुग्णात अद्याप डेंग्यूचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र काही रुग्ण मलेरियाचे आढळून आले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या येणारे बहुतांश रुग्ण वायरल फिवरने ग्रस्त असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मुरंबीकर यांनी दिली.
सर्पदंशाची औषध उपलब्ध
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि शेतीचाही हंगाम आहे. या दिवसात साप, विंचू यासारखे विषारी प्राणी बिळातून बाहेर निघतात. अनवधनाने मानवाचा त्यांच्यावर पाय पडून सर्पदंशाच्या घटना घडतात. अशावेळी सर्पदंशाच्या रुग्णावर तात्काळ उपचार व्हावा, यासाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालयात सर्पदंशाची औषध उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती चंद्रपूरचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मुरंबीकर यांनी लोकमतशी बोलताना दिली.
आरोग्य यंत्रणेने सतर्क राहण्याची गरज
पावसाळ्याच्या दिवसात आरोग्य यंत्रणेने सतर्क राहून रुग्णांना सेवा देणे आवश्यक असते. मात्र आरोग्य उपकेंद्रात सोईसुविधांचा अभाव असल्याने असे उपकेंद्र अखेरच्या घटका मोजत आहे. गावात तातडीने शिबिर लावून नागरिकांची तपासणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.