‘व्हायरल फ्लू’चे थैमान

By admin | Published: July 30, 2016 12:44 AM2016-07-30T00:44:10+5:302016-07-30T00:44:10+5:30

सध्या पावसाळा सुरू असून अनेक गावात अस्वच्छता पसरली आहे.

'Viral flu' | ‘व्हायरल फ्लू’चे थैमान

‘व्हायरल फ्लू’चे थैमान

Next

आरोग्य विभाग सुस्त : बालकांना मलेरियाची लागण, साथीचे आजार वाढले 
चंद्रपूर : सध्या पावसाळा सुरू असून अनेक गावात अस्वच्छता पसरली आहे. या अस्वच्छतेवर डासांचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात वाढला असून अनेक गावात साथीचे आजार बळावले आहेत. लहान मुलांना मलेरिया आजाराने ग्रासले असून दोन दिवसांपुर्वी राजुरा तालुक्यातील टेकामांडवा येथील एकाचा गॅस्ट्रोमुळे मृत्यू झाला. आरोग्य विभाग मात्र उपाययोजना सुरू असल्याचे सांगत, सुस्त दिसून येत असल्याने नागरिकांत प्रचंड रोष पसरला आहे.
हातापायाचे सांधे दुखणे, मळमळ होणे, ताप येणे, शरीर दुखणे अशी लक्षणे असणारी अनेक नागरिक आढळून येत आहेत. त्यामुळे घर तेथे रुग्ण अशी परिस्थिती ग्रामीण भागात असून संबधीत गावातील ग्रामपंचायतीने गावाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने ही समस्या उद्भवल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. मात्र आरोग्य विभागानेही साथीच्या आजारावर प्रतिबंध घालण्यासाठी कोणत्याही विशेष उपाययोजना न केल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.
गावातील गटार, नाल्यात साचलेले पाणी, शौचालय खड्डे, कुलर, वापर नसलेली विहिर यातून डासांचे प्रजनन मोठ्या प्रमाणात होत आहे. गावात असलेले शेणखताचे ढिगारे, रस्त्यावरील सांडपाणी यामुळे अनेक गावात दुर्गंधी पसरली आहे. यातूनच हिवताप, कॉलरा, हगवण, डेंग्यू अशा आजारांनी नागरिकांना पछाडले आहे. गढूळ पाण्याचा वापर टाळावा, पाणी उखडून प्यावे, तसेच परिसर स्वच्छ ठेवावे असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

ग्रामपंचायतीचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष, दूषित पाण्याने आजार वाढले
विरूर परिसरात साथीचे आजार
विरुर (स्टे) : ‘स्वच्छ सुंदर गाव’ असावे अशी सर्वांची अपेक्षा असते. मानवी आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी गावाची स्वच्छता महत्त्वाची भूमिका बजावते. मात्र या वास्तवाला दुर्लक्षित करून विरूर परिसरातील अनेक गावाने स्वच्छतेकडे कमालीचे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे साथीच्या आजार वाढले असून आजारग्रस्तांची संख्या वाढली आहे. ग्रामपंचायत अधिनियमानुसार गावात स्वच्छता राखण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असते. मात्र ग्रामस्थांकडून गृहकर, पाणीकर आदी वसुली करूनही स्वच्छतेकडे कानाडोळा होत केल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर झाला आहे. रुग्णांना आरोग्य सुविधा पुरवण्याची जबाबदारी हिवताप विभाग व नजीकच्या आरोग्य केंद्राची आहे. परंतु अनेक रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहात नसल्याचे चित्र आहे.

नांदगाव-घोसरी परिसरात
तापाची साथ
पोंभुर्णा तालुक्यातील नांदगाव-घोसरी परिसरात तापाची साथ सुरू असून अनेकांना तापाने ग्रासले आहे. घोसरी उपकेंद्रात आरोग्य सेवकाचे पद रिक्त असल्याने नागरिकांना उपचार मिळणे कठीण झाले आहे. नवेगाव मोरे आरोग्य केंद्रातर्गत येत असलेल्या देवाडा (बु.) व जुनगाव येथेही गेल्या १० दिवसांपासून तापाची साथ सुरू असून अनेक रूग्ण तापाने फणफणत आहेत. नळयोजनेची पाईपलाईन लिकेज असल्याने गावाला गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. हाच पाणी नागरिक पितात. त्यामुळे जलजन्य आजार वाढले आहेत.

वरोऱ्यातही ‘व्हायरल फ्लू’
वरोरा शहरातही गेल्या काही दिवसांपासून तापाची साथ पसरली आहे. दवाखान्यात रुग्णांची गर्दी होत आहे. नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने अनेक महिन्यांपासून धूर फवारणी केलेली नाही. त्यामुळे शहरातील कॉलरी वॉर्ड, कर्मविर वॉर्ड, राजीव गांधी वॉर्ड, मालविय वॉर्डात गेल्या काही दिवसांपासून तापाची साथ सुरू आहे. प्रत्येक घरी एक रुग्ण अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

मोखाळा येथे गॅस्ट्रोची लागण
सावली : तालुक्यातील मोखाळा येथे ताप आणि गॅस्टोने थैमान घातले असून अनेक रुग्ण गॅस्ट्रोने पीडित आहेत. मागील पाच दिवसांपासून ही साथ सुरू आहे. आरोग्य विभागाने बुधवारी गावात जाऊन शिबिर लावले असून, नागरिकांची तपासणी सुरु केली आहे गेल्या पाच दिवसांपासून गावात गॅस्ट्रोची साथ पसरलेली असून आरोग्य सेविका मुख्यालयी नसल्याने गावकऱ्यांत रोष पसरला आहे. सध्या आरोग्य विभागातर्फे अतिसार नियंत्रण पंधरवडा व पावसाळापूर्व रोगांवर प्रचार- प्रसाराचा उपक्रम सुरु आहे.

Web Title: 'Viral flu'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.