विरूर स्टेशन बनला तांदूळ तस्करांचा थांबा; ब्रह्मपुरी व गोंदियात जादा भावाने विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2022 05:00 AM2022-01-30T05:00:00+5:302022-01-30T05:00:38+5:30
महाराष्ट्राचे शेवटचे टोक असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील विरुर (स्टे.) हे गाव तेलंगणा राज्याच्या सीमेवर आहे. या ठिकाणी रेल्वेतून तेलंगणात स्वस्त धान्य दुकानात मिळणारा एक रुपया किलोचा तांदूळ पॅकिंग बदलून दुसऱ्या पिशवीमध्ये भरून विरुर (स्टे.) येथील रेल्वे स्टेशनवर उतरविला जात आहे. त्या ठिकाणी स्थानिक परिसरातील आठ ते दहा तांदूळ तस्कर आपल्या चारचाकी वाहनाने रेल्वे स्टेशनवर उतरलेला तांदूळ वाहनात भरून गोडाऊनमध्ये नेतात. नंतर हाच तांदूळ ब्रह्मपुरी, गोंदिया येथे जास्त दराने विकला जातो.
बी. यु. बोर्डेवार
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा : महाराष्ट्रालगतच्या तेलंगणा राज्यातील स्वस्त धान्य दुकानात एक रुपया किलोने मिळणारा तांदूळ पॅकिंग बदलून थेट महाराष्ट्राच्या राजुरा तालुक्यातील विरूर स्टेशन येथे रेल्वेने पोहोचत आहे. हा तांदूळ रेल्वे गाडीची वाट पाहणारे तस्कर थेट ब्रह्मपुरी, गोंदियासह अन्य भागांत नेऊन त्यावर पुन्हा प्रक्रिया करून जादा दराने विक्री करीत असल्याची धक्कादायक माहिती ‘लोकमत’ने केलेल्या रिॲलिटी चेकमधून पुढे आली आहे. विरूर पोलीस ठाणे हाकेच्या अंतरावर असताना कोणीही याबाबत शंका घेत नाही. पुरवठा विभागही डोळे मिटून असल्याचे चित्र आहे.
महाराष्ट्राचे शेवटचे टोक असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील विरुर (स्टे.) हे गाव तेलंगणा राज्याच्या सीमेवर आहे. या ठिकाणी रेल्वेतून तेलंगणात स्वस्त धान्य दुकानात मिळणारा एक रुपया किलोचा तांदूळ पॅकिंग बदलून दुसऱ्या पिशवीमध्ये भरून विरुर (स्टे.) येथील रेल्वे स्टेशनवर उतरविला जात आहे. त्या ठिकाणी स्थानिक परिसरातील आठ ते दहा तांदूळ तस्कर आपल्या चारचाकी वाहनाने रेल्वे स्टेशनवर उतरलेला तांदूळ वाहनात भरून गोडाऊनमध्ये नेतात. नंतर हाच तांदूळ ब्रह्मपुरी, गोंदिया येथे जास्त दराने विकला जातो. या तांदळाला मिलमध्ये पिसून दुसऱ्या पिशवीत भरून लेबल लावून जादा दराने विक्रीला नेला जातो.
गडचिरोली जिल्ह्यातही तस्करीचे जाळे
मंचेरियाल, जयशंकर भोपणपल्ली येथून थेट गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथे हा तांदूळ येत आहे. देसाईगंजमार्गे राज्यात हा सरकारी तांदूळ विकला जात आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील पुरवठा अधिकारी हे सतर्क नसल्याने हा कोट्यवधींचा गोरखधंदा राजरोसपणे सुरू आहे. दोन्ही जिल्ह्यातील राईस मिल हे मुख्य केंद्र आहे. या राईस मिलमध्ये प्रक्रिया करून भेसळ करून एक रुपया किलोचा तांदूळ पॉलिश करून नवे लेबल लावून भरमसाट दरात विकला जात आहे. अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे.