‘त्या’ विषाणूने बदलविले चिमुकल्यांपासून वृद्धांची लाइफस्टाइल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:29 AM2021-04-07T04:29:33+5:302021-04-07T04:29:33+5:30
सोप्या व्यायामांचा कळला अर्थ! घरातल्या घरातील साध्या-सोप्या व्यायामांचे महत्त्व मोठे आहे. मात्र, कोरोनापूर्वी या व्यायामांकडे अनेकांनी दुर्लक्ष केले. खांदे ...
सोप्या व्यायामांचा कळला अर्थ!
घरातल्या घरातील साध्या-सोप्या व्यायामांचे महत्त्व मोठे आहे. मात्र, कोरोनापूर्वी या व्यायामांकडे अनेकांनी दुर्लक्ष केले. खांदे पुढे-मागे रोल करावा. उभे राहून किंवा खुर्चीवर बसून डाव्या आणि उजव्या बाजूस थोडे वाकावे, पाय गुडघ्यात वाकवून उचलण्याचा प्रयत्न करावा, काही वेळ जागच्या जागी लावावा, अशा पद्धतीच्या वॉर्मअप व्यायामामुळे आरोग्याला मोठा लाभ होतो, हे कोरोना संसर्ग झाल्यानंतर कळाल्याची माहिती चंद्रपुरातील रामनगर निवासी श्रीधर लोंढे यांनी दिली.
आहार आता सांभाळूनच
कोरोनामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांपासून तर मध्यवर्गीयांमध्ये आपल्या दैनंदिन आहाराबाबत जागरूकता वाढल्याचे निरीक्षण डॉ. शंशाक राजुरकर यांनी नोंदविले. कार्बोहायड्रेडयुक्त पदार्थांऐवजी प्रोटीनयुक्त पदार्थांकडे नागरिक लक्ष देऊ लागले आहेत. जेवण करताना बरीच कुटुंबे आता गरम पाणी पिऊ लागली आहेत. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आपल्या क्षमतेप्रमाणे पौष्टिक आहाराकडे लक्ष देत आहेत. पालक आपल्या पाल्यांच्या आहाराची काळजी घेत आहेत. कोरोनामुळे हा बदल घडला, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
‘पॉझिटिव्ह थिंकिंग’मधून डिप्रेशनवर मात
कोरोनापासून कुणाचीही सुटका नाही, याची अनेकांच्या मनात धास्ती आहे. यातून सतत भीती वाटत राहते. रोजगाराची साधने गेल्याने सतत डिप्रेशनमध्ये असणाऱ्यांचीही संख्या वाढू लागली. या मानसिक धक्क्यातून बाहेर पडणे काहींना शक्य होत नाही. मात्र, सतत सकारात्मक मानसिकता ठेवली, तर तणाव कमी होऊन जगण्याचे पर्याय शोधायला बळ मिळते. हा अॅक्टिव्हनेस संकटातही तारक ठरतो.
‘हा’ ओव्हरडोस मुळावर
समाजमाध्यमांचा ओव्हरडोस होत आहे. याचा अतिवापर अनेकांच्या मुळावर आला आहे. कोरोना महामारीत कौटुंबिक नात्यातील ओलावा टिकविण्यासाठी या माध्यमाचा जपून वापर करण्याची गरज आहे. समाजमाध्यमांमुळे माणसे आभासी पद्धतीने जवळ आली; पण नकारात्मकता पसरत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात लॉकडाऊन काळात ८०० पेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले आहेत.
वर्किंग कल्चरचा नवा ट्रेंड
चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या उद्योग कंपन्यांची संख्या अत्यल्पच आहे. त्यामुळे सध्यातरी वर्क फ्रॉम होम ही संकल्पना प्रत्यक्षात सुरू झाली नाही. मात्र, काही कंपन्यांनी कामाच्या वेळात बदल केला. कोरोनामुळे कामगारांनीही वर्किंग कल्चरचा नवा ट्रेंड स्वीकारल्याचे दिसून येते. शासकीय कर्मचारीही आता वेळेचे तंतोतंत पालन करीत आहेत.
विभागप्रमुखांनी घेतले मनावर
कोरोनामुळे खासगी व शासकीय कार्यालयांत स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जात आहे. कोरोनाची साथ येण्यापूर्वी विशेषत: शासकीय कार्यालयांचे याकडे दुर्लक्ष झाले होते. स्वच्छतागृहांची साधी डागडुजीही केली जात नव्हती. मात्र, आपत्ती व्यवस्थापन व साथरोग नियंत्रण कायदा लागू झाल्याने विभागप्रमुखांचे याकडे लक्ष गेले. त्यामुळे जिल्हास्थळावरील शासकीय कार्यालये व स्वच्छतागृहांची स्थिती सर्वत्र बदलल्याचे चित्र आहे.