विसापुरात वृक्षसंवर्धनाची शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2017 12:40 AM2017-07-01T00:40:31+5:302017-07-01T00:40:31+5:30
जिल्हा परिषद अंतर्गत वृक्षलागवडीचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी वृक्षदिंडी काढल्या जात आहेत.
वृक्षदिंडीचे स्वागत : चार तालुक्यांमध्ये जनजागर
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : जिल्हा परिषद अंतर्गत वृक्षलागवडीचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी वृक्षदिंडी काढल्या जात आहेत. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे वृक्षदिंडीचे स्वागत करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांना वृक्षसंवर्धनाची शपथ देण्यात आली.
वृक्षलागवडीसाठी वृक्षदिंडीचे आयोजन करणारी एकमेव जिल्हा परिषद आहे. वृक्षदिंडीद्वारा गावागावात वृक्षसंवर्धनाचे काम केल्या जात आहे. वृक्षदिंडीच्या तिसऱ्या दिवशी बल्लारपूर, राजुरा, कोरपना, जिवती या तालुक्यातील गावातून जनजागरण करण्यात आले.
वृक्षामुळेच या सृष्टीवरील सर्व जीवजंतू जीवंत असून, या सृष्टीला सुंदर ठेवण्याकरिता गावातील प्रत्येकांनी आपले कर्तव्य म्हणून किमान एक वृक्ष लावून त्याची जोपासना केली पाहिजे. शुध्द हवा चांगले वातावरण निर्माण करण्याकरिता वृक्ष लागवड व संवधार्नाची गरज असून, वृक्षसंवर्धन हेच खरे पूण्याचे काम आहे. असे प्रतिपादन जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी यावेळी केले.
यावेळी उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, कृषी सभापती अर्चना जिवतोडे, महिला बालकल्याण सभापती गोदावरी केंद्रे उपस्थित होत्या. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर, बामणी या गावात वृक्षदिंडीचे स्वागत सभापती गोविंदा पोडे, गटविकास अधिकारी संध्या दिकोंडावार यांनी केले. पुढे दिंडीने राजुरा तालुक्याकडे मार्गक्रमन केले. राजुरा येथे वृक्षदिंडीचे स्वागत पंचायत समितीच्या सभापती जेणेकर यांनी केले. जेणेकर यांनी राजुरा तालुक्यातील वृक्षलागवड व वृक्षसंगोपणाचे पालकत्व स्विकारत असल्याचे जाहीर केले. राजुऱ्यातील चंदनवाही या गावातून वृक्षदिंडी व सभा घेऊन वृक्षरोपनाविषयी ग्रामस्थांना विनंती करण्यात आली . पुढे वृक्षदिंडीचे कोरपना पंचायत समितीचे सभापती शाम रणदिवे व गटविकास अधिकारी संदिप घोन्सिकर यांनी वनसडी या गावात स्वागत केले. या गावात वृक्षदिंडी काढून गृहभेटी घेण्यात आली. शाळेच्या परिसरात सभा घेऊन ग्रामस्थांना वृक्षलागवडीची विनंती करुन, वृक्षसंवर्धनाची शपथ देण्यात आली. यावेळी जि.प.चे सदस्य उपस्थित होते.