कोरोना लसीकरण केंद्राला किशोर जोरगेवार यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:27 AM2021-05-16T04:27:18+5:302021-05-16T04:27:18+5:30
चंद्रपूर : जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कोरोना लसीकरण केंद्राला आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट देत येथील उपाययोजनांची पाहणी केली. ...
चंद्रपूर : जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कोरोना लसीकरण केंद्राला आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट देत येथील उपाययोजनांची पाहणी केली. लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांची सुविधा अभावी गैरसोय होऊ नये, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहे. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड, डाॅ. अभय राठोड आदी उपस्थित होते. कोरोना लसीच्या तुटवड्यामुळे मध्यंतरी अनेक लसीकरण केंद्र बंद पडले होते. त्यामुळे अनेकांना लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागली. मात्र आता जिल्ह्यात बऱ्यापैकी लसीचा साठा उपलब्ध झाला आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांनी लसीकरणासाठी केंद्रावर जाण्याचे आवाहन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले आहे. दरम्यान त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे सुरु असलेल्या लसीकरण केंद्राला भेट देत येथील उपाययोजनांची पाहणी केली. यावेळी नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेता केंद्रावर येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी खुर्च्यांची व नागरिकांचे तापत्या उन्हापासून रक्षण करण्यासाठी मंडपाची व्यवस्था केली. तसेच इतर सोईसुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या. विशेष म्हणजे या केंद्रावर कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या दोनही लसीचे लसीकरण करण्यात येत असून सर्वाधिक लसीकरण करणारे हे केंद्र आहे. या केंद्रावर हेल्पिंग हॅण्ड नामक संस्थेचे पदाधिकारी स्वंयस्फूर्तीने प्रशासनाची मदत करत असून येथे होणारी गर्दी नियंत्रित ठेवण्याचे काम करत आहे. त्यांच्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक ही केले.