नवरात्रीत करा चंद्रपुरातील या देवींचे दर्शन; बघा जिल्ह्याची प्राचीन शिल्प श्रीमंती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 03:20 PM2024-10-07T15:20:05+5:302024-10-07T15:20:45+5:30

Chandrapur : चंद्रपूरच्या प्राचीन शिल्पातील देवी दर्शन

Visit these goddesses in Chandrapur during Navratri; See the ancient architectural wealth of the district | नवरात्रीत करा चंद्रपुरातील या देवींचे दर्शन; बघा जिल्ह्याची प्राचीन शिल्प श्रीमंती

Visit these goddesses in Chandrapur during Navratri; See the ancient architectural wealth of the district

चंद्रपूर : प्राचीन काळातील उपासनेत देवी उपासनेला महत्त्वाचे स्थान होते. त्याचे मुख्य कारण मानव स्त्रीचे महत्त्वाचे स्थान हे असावे. मातेच्या रुपातील देवी ही जन्म व संवर्धनाकरिता प्रेरक समजली जाते. ती शत्रूचे संहारकर्ती म्हणूनही दाखवली जाते. चंद्रपूर जिल्ह्यात देवी उपासना प्राचीन काळापासून असल्याचे पुरावे आहेत. पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय विभागाचे निवृत्त अभिरक्षक व संशोधक डॉ. रघुनाथ बोरकर यांनी नवरात्रोत्सवानिमित्त जिल्ह्यात उत्खननात सापडलेल्या देवी मूर्तीची अभ्यासपूर्ण माहिती दिली. यावरून जिल्ह्यातील प्राचीन शिल्प श्रीमंती लक्षात येते. 


वैदिक उपासना पद्धतीत देवापेक्षा देवीचे महत्त्व कमी लेखले असले तरी शाक्त पंथीयांच्या मतानुसार, शक्ती हे जगाचे आदिकरण समजून तिच्यापासूनच जग उत्पन्न झाले अशी त्यांची धारणा आहे. चंद्रपूर जिल्ह्यात देवी प्रतिमा प्रामुख्याने इ.स. ४-५ व्या शतकापासून आढळतात. देवीच्या या प्रतिमा स्वतंत्र शैलगृहात मंदिरांच्या जंघाभागावर, स्तंभावर स्थानापन्न आहेत. बहुतांश मूर्ती या मोकळ्या असून, दुरवस्थेत पड पडलेली आहेत. महिषासुरमर्दिनी ही देवी प्रतिमा त्यापैकीच ए एक. या देवीचा समावेश देवतासप्तक आणि देवता पंचायतनात केलेला दिसतो. अमरकोशात हिला पार्वतीचेच एक रूप असल्याचे समजले आहे. महाभारत व हरिवंशात हिला कृष्णाची बहीण व यशोदेची मुलगी असल्याचे म्हटले आहे. मत्स्यपुराणात ही ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवांच्या अंशातून बनली असल्याचे सांगितले आहे. बामणपल्ली येथील एकमेव प्रतिमा ही अष्टभुजी आहे. 


शैलगृहातील प्रतिमा 
वरोरा तालुक्यातील भटाळा येथील लघु शैलगृहातील क्र. ११ व १७ या दोन शैलगृहात स्वतंत्रपणे महिषसुरमर्दिनीच्या प्रतिमा कोरल्या आहेत. त्या चतुर्भूज असून, आलीढासनात उभ्या आहेत. डाव्या एका हाताने उसळत्या महिषाचे मुख धरले आहे. उजव्या एका हाताने त्रिशूळ महिषाच्या पाठीत खुपसलेले दाखविले आहे. उजवीकडील दुसऱ्या हातात तलवार धरली असून, डाव्या दुसऱ्या हातातील आयुध स्पष्ट दिसत नाही. बहुदा ते महिषाचे कापलेले शीर्ष असावे. प्रतिमा लक्षणावरून या मूर्तीचा निर्मिती काळ इ. स. ४-५ वे शतक असा ठरविता येतो. महादेव मंदिर घंटाचौकी, महादेव मंदिर नेरी, केशवनाथ मंदिर जुनासुर्ला या मंदिरांच्या जंघाभागावर आणि सोमेश्वर मंदिर राजुरा येथील सभा मंडपातील स्तंभावर महिषासुरमर्दिनीच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. येथील प्रतिमासुद्धा चतुर्भुज असून, आलीढासनात उभ्या आहेत.


द्विभूज स्थानक प्रतिमा
या प्रकारातील मूर्ती भद्रावती येथील चंडिका मंदिरात आहे. या मूर्तीस चंडिका या नावाने ओळखले जाते. म्हणजेच हे पार्वतीचे संहार रूप होय. चंडिका द्विभंगात उभी असून, ती द्विहस्त आहे. दोन्ही हात मनगटापासून तुटले आहेत. ही प्रतिमा मुकुटविरहित असून, तिने कुंडले, गळ्यात एकावली स्तनहार, उदरबंध, मेखला अलंकार परिधान केले आहे. उजव्या पायाजवळ तिचे वाहन सिंह दाखविले. डाव्या व उजव्या बाजूला स्त्री-पुरुष उपासक दाखविले आहेत. मूर्तीचा काळ इ.स. १०-११ वे शतक असा आहे. 


मोकळ्या मूर्ती (चतुर्भुज) 
या प्रकारातील मूर्ती भद्रावती येथे तीन आणि नारंडा येथे एक अशा एकूण चार प्रतिमा या जिल्ह्यात आहेत. भद्रावती येथील तिन्ही प्रतिमा या चतुर्भुज जरी असल्यातरी तिन्हीतही वेगवेगळेपणा दिसतो. यातील एका मूर्तीत प्रत्यालीढासनात उभ्या असलेल्या देवीने तिचा उजवा पाय महिषाच्या शीर्षावर ठेवला आहे. येथे महिषाचा धडापासूनचा भाग पुरुष रूपात दाखविला. या रूपातील महिषाचा एक पाय देवीने आपल्या डाव्या हाताने पकडला. हे या प्रतिमेचे एक वैशिष्ट्य म्हणून सांगता येते. महिषाचे शीर्ष देवीने कापल्याने ते धडापासून वेगळे झालेले येथे दाखविला आहे. देवीने तिच्या उजव्या खालच्या हातात त्रिशूळ धरले. वरच्या उजव्या हातात तलवार धरली आहे. तलवार शीर्षामागून युद्धस्थितीत धरलेली आहे. देवीने किरीटमुकुट, कानात कुंडले, गळ्यात एकावली व लांब हार, उदरबंध, मनगटात चार कड्याचे कंगण, कटकवलय, इ. अलंकार परिधान केले. मूर्तीचा निर्मिती काळ इ.स. ८- ९ वे शतक आहे. 


जिल्ह्यातील देवी प्रतिमांची प्राप्तीस्थाने 
१) भटाळा (वरोरा तालुका) २) महादेव मंदिर घंटाचौकी (चंद्रपूर) ) महादेव मंदिर नेरी (चिमूर) ३ ४) केशवनाथ मंदिर जुनासुर्ला ५) सोमेश्वर मंदिर राजुरा ६) भद्रावती (भद्रावती) ७) नारंडा (राजुरा)
 

Web Title: Visit these goddesses in Chandrapur during Navratri; See the ancient architectural wealth of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.