नेत्रहीन बालक चेतन उचितकरची प्रकाशवाट
By admin | Published: April 23, 2017 01:00 AM2017-04-23T01:00:45+5:302017-04-23T01:00:45+5:30
एक मुलगी झाली. आता संतती नियोजन करावे, असे त्यांनी ठरविले. मात्र एक मुलगा होऊ द्या, मग शस्त्रक्रिया करू असा आग्रह पत्नीने धरला.
प्रगतीचा मार्ग स्वत:च शोधला : दिव्यांगात्वावर अंगातील कलागुणांनी केली मात
वसंत खेडेकर बल्लारपूर
एक मुलगी झाली. आता संतती नियोजन करावे, असे त्यांनी ठरविले. मात्र एक मुलगा होऊ द्या, मग शस्त्रक्रिया करू असा आग्रह पत्नीने धरला. प्रतीक्षा केली. मुलगा झाला. पण, जन्मत:च आंधळा! त्या पेक्षा हा नसता झाला तर बरे होते, असा दोघांचाही नाराजीचा सूर! पण, त्यांना काय माहीत की हाच अंध बाळ पुढे आपल्या घराण्याचे नाव करणार आणि स्वगुणाने स्वत:च्या प्रगतीचा मार्ग शोधून, त्यासोबतच समदु:खितांसाठी प्रकाश वाट तयार करणार!
वाशिम जिल्ह्यातील आडवळणाऱ्या केकतउमरा या गावातील १२ वर्ष वयाचा गायक, वादक आणि व्याख्याता अंध चेतन पांडूरंग उचितकर याची ही कथा! चेतन हा वयाच्या सहाव्या वर्षापासून जागोजागी व्याख्यान देत फिरत आहे. त्याच्यात मग संगीताची व गायनाची आवड निर्माण झाली. पुढे त्याच्या पुढाकाराने, त्याच्याच वयोगटातील अंध गायक-वादकांना एकत्रित करून ‘चेतन स्वरांकुर’ नावाचा संगीत समूह तयार केला. या संगीत समूहाचा गीत गायनाचा श्रुतिमधूर कार्यक्रम बल्लारपुरात झाला. संगीत कार्यक्रमातून मिळणाऱ्या मानधनातून हा समूह गरजवंतांना मदतही करतो, असे त्याबद्दल ऐकले आणि ‘लोकमत’ने चेतनची मुलाखत घेतली. बोलण्यात चतूर, विनम्र, मृदूभाषी व समाज कार्याची मनात खूप आवड ठेवणारा चेतन त्याच्या नावाप्रमाणेच चेतनशील व उपक्रमी आहे. त्याने मुलाखतीची सुरूवातच देवाने आमची दृष्टी हिरावली, पण त्याने आमचे मन आणि बुध्दी कायम ठेवली. तेच आमचे बळ आहे, असे सकारात्मक विचार मांडत, जग सुंदर आहे असे म्हणतात. पण ते आम्हाला बघता येत नाही. आणि सर्वात मोठे वाईट याचे वाटते, आमचे आई बाबा आमच्याकरिता खूप करतात. पण ते कसे आहेत, काळे की गोरे हे आम्ही बघू शकत नाही, अशी संवेदना व्यक्त केली. व्याख्यान देणे त्याला आवडते. याबाबत तो सांगतो, आतील प्रेरणेतून चांगले विचार तोंडी येतात. देवाने भाषण कौशल्य दिले. शाळेतून, संस्थांकडून त्याकरिता बोलावणे येते. व्यसनमुक्ती, स्वच्छता, कुटुंब नियोजन याबाबत व्याख्यानातून समाज प्रबोधन करीत फिरतो. विद्यार्थ्यांना माझे एकच सांगणे आहे. आम्ही अंध आहोत. तुम्ही डोळस आहात. चांगले वागा, अभ्यास करा, आई बाबांना दुखवू नका, व्यसनाधीन होऊ नका. माझे बोलणे लोकांना आवडू लागले. मोठाले मंच मिळत गेले. पुढे माझ्यासारखाच अंध असलेल्या व संगीताची चांगली जाण असलेल्या अनाथ प्रवीण कठाळे याची भेट झाली. त्याच्यााासून संगीताचे धडे घेतले. तेव्हापासून व्याख्यानासोबतच गाणे गाऊ लागलो. आजवर राज्यासोबत परप्रांतात फिरून एकूण ३७२ कार्यक्रम केले आहेत, असे तो कार्यक्रमाविषयी सांगतो. या कर्तृत्वासोबतच त्याच्यात दातृत्वाचे गुण आहे. त्याला दातृत्वाची प्रेरणा त्याच्या गावातूनच मिळाली. त्याच्या झोपडीत सौर उर्जेचे कंदील आहेत. त्याच्या घराच्या दूरच्या घरांमध्ये रात्रीला अंधार दिसायचा. गरिबांची ती वस्ती! त्याने वडिलाला सांगितले. गायनाच्या मानधनातील पैशांमधून त्यांना सौर उर्जेचे कंदील देऊ आणि ते त्याने दिले आणि त्यानंतर जेथे तेथे गरज पडली. त्याने मदत केली. आजवर १ लाख रुपयांचे कंदील, स्वच्छतेकरिता साबण व नेलकटर, तदवतच आंधळण्या मुलांना, त्यांची सोबत करू शकणारे रेडीओ घेऊन दिले आहेत. चेतनचे वडील सांगतात, त्याचे कर्तृत्व आणि दातृत्व तदवतच त्याच्यातील गायन कला बघून बाबा रामदेव, प्रकाश आमटे, मेघा पाटकर, विजय भटकर, पोपटराव पवार या साऱ्यांनी त्याचे जाहीर कौतुक केले. चेतनला पुढे रवींद्र जैन प्रमाणे संगीतकार व्हायचे आहे. सुरेश वाडकर हे त्याच्या आवडीचे गायक आहेत. चेतन संगीताच्या परीक्षा पास झाला आहे. त्याच्या स्वरांकुलमधील सर्वच अंध गायक त्याच्याच घरी राहतात. शाळा शिकतात. त्याचे वडील आणि आई या साऱ्यांची काळजी घेतात. असे दातृत्व कुठे बघायला मिळणार !