विद्यार्थ्यांसाठी मतदार नोंदणी कार्यशाळा
By Admin | Published: October 16, 2016 12:49 AM2016-10-16T00:49:31+5:302016-10-16T00:49:31+5:30
चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे मतदार यादीमध्ये नाव समाविष्ठ नाही व १ जानेवारी २०१७ रोजी वयाला १८ वर्ष पूर्ण होत आहे,
चंद्रपूर मनपाचा पुढाकार : लोकशाही हक्काची सनद
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे मतदार यादीमध्ये नाव समाविष्ठ नाही व १ जानेवारी २०१७ रोजी वयाला १८ वर्ष पूर्ण होत आहे, अशा व्यक्तींची मतदार नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने जनता महाविद्यालयाच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींची मतदार नोंदणी करण्याबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
यावेळी अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.सुभाष होते. प्रमुख अतिथी मनपा आयुक्त संजय काकडे, उपायुक्त डॉ. विजय इंगोले व सहायक आयुक्त अश्विनी गायकवाड यांची उपस्थिती होती. गायकवाड म्हणाल्या की, ज्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचे वय १ जानेवारी २०१७ रोजी १८ वर्ष पूर्ण होत असेल किंवा ज्याचे वय १८ वर्ष पूर्ण झाले असेल, त्यांनी आपली नावे नोंदवावी. तसचे ज्यांच्या नावात व मतदान ओळखपत्रात दुरुस्ती करावयाची असेल तीसुद्धा करून घ्यावी. मतदानाच्या अधिकाराबाबत विद्यार्थी व एन.सी.सी. कॅडेट्सना नावाची नोंद करण्याचे आवाहन अश्विनी गायकवाड यांनी केले.
मनपाचे उपायुक्त डॉ. विजय इंगोले यांनी विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले. मतदान करणे आपणास आवडेल काय, अशी विचारणा करून लोकशाहीमध्ये मतदानाच्या हक्कामुळे आपल्या आवडीचा लोकप्रतिनिधी निवडता येतो. त्याकरिता मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट असणे आवश्यक आहे. मतदार यादीत नोंदणी करण्याबाबत विद्यार्थ्यांना त्यांनी आवाहन केले. (प्रतिनिधी)
मतदानातून
प्रतिनिधी निवडावा
मनपाचे आयुक्त संजय काकडे म्हणाले की, मतदानाचे महत्त्व जाणून त्याचा फायदा करून घ्यावा. प्रत्यक लोकसभा, विधानसभा निवडणुकीत ४० ते ५० हजार नवीन मतदार समाविष्ट होतात. त्यात युवकांचे प्रमाण जास्त असते. त्यातही ९० वर्षांचा म्हातारा मतदानाचा हक्क बजावतो. परंतु ३० वर्षाची व्यक्ती मतदान करीत नाही अशांची टक्केवारी ५० टक्के आहे. तुम्हाला तुमच्या शहराचा, महाराष्ट्राचा व देशाचा प्रतिनिधी निवडतांना तुमच्या मतदानाच्या अधिकारातूनच ठरविता येतो, या करिता आपण सर्वांनी तसेच आपल्या कुटुंबातील सदस्यांना व शेजारच्या नागरिकांना मतदार नोंदणी करून घेण्याबाबत कळवावे. मतदानाचा अधिकार प्राप्त करून घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.