आंबोलीतील मतदारांची सुशिक्षित युवा उमेदवारांनाच पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:25 AM2021-01-21T04:25:59+5:302021-01-21T04:25:59+5:30
शंकरपूर : आंबोली येथील ग्रामपंचायत निवडणुकीत नागरिकांनी उच्च विद्याविभूषित सातही उमेदवारांना पसंती देऊन गावाची विकास धुरा ...
शंकरपूर : आंबोली येथील ग्रामपंचायत निवडणुकीत नागरिकांनी उच्च विद्याविभूषित सातही उमेदवारांना पसंती देऊन गावाची विकास धुरा सोपविली. आंबोलीत नऊ सदस्य आहेत.
बाहेरगावी शिक्षण घेऊन गावात परत आलेल्या युवकांनी गाव सुधारण्यासाठी युवा मंचची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी युवक - युवतींना प्रशिक्षण देण्याचे काम केले. स्वच्छता मोहीम राबविली. शासकीय कामातील अडचणी सोडविण्याचे कार्य केले. लॉकडाऊन काळात सर्व शाळा बंद होत्या. पण युवकांनी गावातील मुलांना एकत्र करून शिक्षणाचे धडे दिले. गावातील भिंती बोलक्या केल्या. विकासासाठी ग्रामपंचायतवर सत्ता असणे गरजेचे आहे हे समजून आले. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत उभे राहण्याचा संकल्प केला. हे सुशिक्षित विद्यार्थी युवा मंच परिवर्तन पॅनल तयार करून निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आणि नऊपैकी सात उमेदवार निवडून आले. कला शाखेचा पदवीधर असलेला केशव गजबे, अभियंता शाखेचा वैभव ठाकरे, कला शाखेच्या पदवीधर शालिनी दोहतरे, वाणिज्य शाखेत पदवीप्राप्त शुभम मंडपे, कृषी शाखेत बीएससी असलेला स्वप्नील गजबे, सायन्स शाखेची पदवी असलेली प्रियंका नागोसे आणि कला शाखेत पदवीधर असलेली रज्जू सवाईकर हे सर्व युवक निवडून आले आहेत. हे सर्व २७ वर्षांच्या आतील आहेत. या युवकांजवळ निवडणुकीसाठी लागणारा निधी नसल्यामुळे त्यांनी गावात व सोशल मीडियावर आर्थिक मदतीचे आवाहन करून निवडणुकीचा खर्च उभा केला होता.