मतदारांनो सावधान! खोटी तक्रार केल्यास होणार दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 10:28 PM2019-03-22T22:28:27+5:302019-03-22T22:29:04+5:30
लोकसभा निवडणूक काही दिवसांवर आली असून विविध राजकीय पक्षांनी आणि कार्यकर्त्यांनी जय्यर तयारी सुरू केली आहे. मात्र देशातील मागील काही निवडणुकींचा इतिहास आणि इव्हीएम मशीनच्या पारदर्शकतेबाबत विरोधी पक्षांची भूमिका लक्षात घेता यावेळी निवडणूक आयोग इव्हीएम सोबतच व्हीव्हीपॅटचाही उपयोग करणार आहे.
साईनाथ कुचनकार।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : लोकसभा निवडणूक काही दिवसांवर आली असून विविध राजकीय पक्षांनी आणि कार्यकर्त्यांनी जय्यर तयारी सुरू केली आहे. मात्र देशातील मागील काही निवडणुकींचा इतिहास आणि इव्हीएम मशीनच्या पारदर्शकतेबाबत विरोधी पक्षांची भूमिका लक्षात घेता यावेळी निवडणूक आयोग इव्हीएम सोबतच व्हीव्हीपॅटचाही उपयोग करणार आहे. या माध्यमातून मतदार ज्या उमेदवाराला मतदान करणार आहे, त्या उमेदवाराचे निवडणूक चिन्ह व्हीव्हीपॅटच्या स्क्रीनवर पाच ते सहा सेंकदपर्यंत बघता येणार आहे. मात्र एखाद्या मतदाराने इव्हीएमच्या पारदर्शकतेवर तक्रार केल्यास आणि त्यात तो दोषी आढळल्यास त्याला सहा महिन्यांचा कारावास, एक हजार रुपये दंड अशी शिक्षा होणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांनी उमेदवार जाहीर केले असून काही पक्षांमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे. यामुळे मतदारांंची उत्सुकता शिगेला पोहोेचली आहे. ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यासाठी प्रशासनाने तयारी केली आहे. मागील काही निवडणुकांमध्ये निवडणूक आयोगाने इव्हीएमचा वापर केला होता. मात्र यात फेरबदल होत असल्याचा विविध राजकीय पक्षांचा आरोप होता. या आरोपांमुळे निवडणूक आयोगाची मोठ्या प्रमाणात देशपातळीवर बदनामाही झाली. त्यानंतर फेरबदल होत असल्याचे सिद्ध करून दाखविण्याचे खुले आव्हाण आयोगाने केले होते. या प्रकारामुळे उमेदवार आणि मतदारांमध्येही संभ्रम निर्माण झाला होता. तर काही राजकीय पक्षांनी बॅलेट पेपरद्वारे जुन्याच पद्धतीने निवडणूक घेण्याची मागणी केली. या मागणीला निवडणूक आयोगाने धुडकावून लावत कोणत्याही परीस्थितीत बॅलेट पेपरद्वारे निवडणूक घेतली जाणार नसल्याचे बजावले. यानंतर आयोगाने इव्हीएन मशीनला व्हीव्हीपॅट जोडण्याचा निर्णय घेतला. यानुसार आता प्रत्येक मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट राहणार असून मतदार ज्या उमेदवाराला मतदान करणार आहे, त्या मतदाराला व्हीव्हीपॅटद्वारे पाच ते सात सेंकदपर्यंत उमेदवाराचे चिन्ह दिसणार आहे. असे असले तरी, काही खोळसाळ नागरिकांनी जर आपले मतदान दुसऱ्या उमेदवाराला गेल्याची तक्रार केली, तर केंद्रअधिकारी तत्काळ त्याच्याकडून एक अर्ज भरून घेणार आहे. त्या अर्जामध्ये खोटी तक्रार केल्यास ‘मी शिक्षेस पात्र राहणार’ असे लिहून घेतले जाणार आहे. त्यानंतर पोलिसात प्रकरण जाणार आहे. जर चौकशीमध्ये तक्रार खोटी किंवा दिशाभूल करणारी असेल तर त्याला भारतीय दंड संहितेनुसार १७७ कलमान्वये शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. ही शिक्षा सहा महिने कैद किंवा एक हजार रुपये दंड किंवा दोन्हीही देण्याची तरतूद आहे. त्यामुळे मतदारांनी सावध राहणे गरजेचे आहे.
अशी आहे व्हीव्हीपॅटची क्षमता
मतदानानंतर व्हीव्हीपॅटद्वारे ज्या उमेदवाराला मतदान केले आहे. त्या उमेदवाराचे चिन्ह पाच ते सात सेंकदपर्यंत मतदारांना दिसणार आहे. त्यानंतर या पॅटद्वारे चिठ्ठी निघणार असून ती पेटीमध्ये बंद होणार आहे. या व्हीव्हीपॅटमध्ये चिठ्यांची क्षमता १ हजार ५०० आहे. म्हणजेच, एका मतदान केंद्रावर जर १ हजार १५०० पेक्षा जास्त मतदार असतील, तर त्या केंद्रावर दोनपेक्षा जास्त व्हीव्हीपॅट ठेवण्यात येणार आहे.