रुग्णांना मदत करण्याचे वडेट्टीवारांचे आश्वासन
By admin | Published: April 8, 2017 12:51 AM2017-04-08T00:51:31+5:302017-04-08T00:51:31+5:30
गडचिरोली सामान्य रुग्णालय येथे भरती असलेल्या ब्रह्मपुरी मतदार संघातील रुग्णांची विचारपूस करुन ....
शस्त्रक्रिया करणार : रुग्णालयात भेट
चंद्रपूर : गडचिरोली सामान्य रुग्णालय येथे भरती असलेल्या ब्रह्मपुरी मतदार संघातील रुग्णांची विचारपूस करुन सावली तालुक्यातील पारडी येथील हिराचंद परशुराम पुडके या रुग्णाच्या शस्त्रक्रियेसाठी त्याला नागपूरला हलविण्याचे निर्देश आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिले. तसेच त्या रुग्णाचा शस्त्रक्रियेचा खर्चही उचलण्याचे आश्वासन वडेट्टीवारांनी यावेळी दिले.
सावली तालुक्यातील पारडी येथील रुग्ण हिराचंद परशुराम पुडके, व्याहाड येथील भैयाजी भोयर व ब्रह्मपुरी तालुक्यातील मुडझा येथील रोशन गोविंदा नदेश्वर या तिन्ही रुग्णांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. अपघातात जखमी झालेला हिराचंद पुडके हा अत्यंत गरीब कुटुंबातील असून त्याच्या मागे म्हातारे आई वडील, पत्नी व एक दोन वर्षाची मुलगी आहे, त्याच्या उजव्या पायाला गंभीर दुखापत असून फॅक्चर आहे. समोरच्या उपचार घेण्याची त्यांची परिस्थिती नाही. अशावेळी आमदार वडेट्टीवार यांनी समोर येऊन हिराचंदच्या शस्त्रक्रियेचा खर्च उचलण्याचे आश्वासन दिल्याने त्याच्या कुटुंबाला दिलासा मिळाला आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यातील मुडझा येथील रोशन गोविंदा नंदेश्वर यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांचीसुद्धा भेट घेऊन उपचार सुरु करण्याचे आदेश दिले. गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात सोयीसुविधांचा अभाव असल्यामुळे रुग्णांना वेळेवर हवे ते उपचार मिळत नाही, म्हणून नाराजी व्यक्त केली. रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे ही समस्या उद्भवत असल्याने ही समस्या दूर करण्यासाठी आरोग्यमंत्र्याकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन आमदार वडेट्टीवार यांनी दिले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. खंडाते, डॉ. रुडे, युवक काँग्रेसचे लोकसभा सचिव कुणाल पेंदोरकर, सतीश नंदगीरवार, मंगेश दिवटे, खरपुंडीचे सरपंच कमलेश खोब्रागडे, स्नेहल संतोषवार, दीपक गद्देवार, सुरेश मशाखेत्री व सावली तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. (नगर प्रतिनधी)