वहिदा रहेमान यांनी लुटला ताडोबा जंगल सफारीचा आनंद..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 04:20 PM2018-03-26T16:20:46+5:302018-03-26T16:22:40+5:30
नागपुरात गेल्या आठवड्यात लोकमतच्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलेल्या सिनेजगतातील ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहेमान व गायक रुपकुमार राठोड यांनी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात तब्बल तीन दिवस मुक्काम ठोकून व्याघ्रदर्शनासह जंगल सफारीचा आनंद लुटला.
राजेश भोजेकर/ राजकुमार चुनारकर
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर: नागपुरात गेल्या आठवड्यात लोकमतच्या सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलेल्या सिनेजगतातील ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहेमान व गायक रुपकुमार राठोड यांनी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात तब्बल तीन दिवस मुक्काम ठोकून व्याघ्रदर्शनासह जंगल सफारीचा आनंद लुटला.
विशेष म्हणजे, त्यांना या सफारीच्या पहिल्याच दिवशी माया वाघिणीने बराच वेळ दर्शन दिले.
वहिदा रहेमान आणि रुपकुमार राठोड हे शनिवारी ताडोबात दाखल झाले होते. त्याच दिवशी त्यांना माया वाघिणीने निवांत दर्शन दिले. इतक्या दीर्घकाळ वाघ बघण्याचा हा अनुभव अतिशय आनंददायक असल्याचे मनोगत वहिदा रहेमान यांनी व्यक्त केले. तिला आपण डोळ्यात साठवून ठेवल्याचेही त्या पुढे म्हणाल्या.
विदर्भाच्या उन्हाळ्यात तीन दिवस जंगलभ्रमण करणे हे तसे सोपे काम नाही. पण निसर्ग व प्राणी प्रेमी असलेल्या वहिदाजींनी त्यावर मात करीत, एखाद्या निष्णात जंगलप्रेमीसारख्या ताडोबातील पर्यटनस्थळांना भेटी दिल्या. सोमवारी दुपारी ताडोबाचा निरोप घेताना त्यांनी ताडोबाविषयीचे आपले मनोगत व्यक्त केले. या ठिकाणी असलेल्या बांबू रिसॉर्टमध्ये त्यांचा मुक्काम होता. ताडोबा हे भारतातील एक महत्त्वाचे अभयारण्य असल्याची पावती गायक रुपकुमार राठोड यांनी यावेळी दिली.