वेकोलिचे मातीचे ढिगारे गावकऱ्यांसाठी ठरले कर्दनकाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 12:55 AM2019-06-09T00:55:25+5:302019-06-09T00:55:58+5:30
राजुरा तालुक्यात बल्लारपूर क्षेत्रांतर्गत वेकोलिच्या भूमीगत व खुल्या कोळसा खाणी आहेत. कोळसा खननासाठी गोवरी, सास्ती, पोवनी, गोयेगाव, अंतरगाव, धोपटाळा व साखरी परिसरात वेकोलिने मातीचे महाकाय ढिगारे नदी व नाल्याच्या किनाऱ्यांवर टाकले. त्यामुळे नैसर्गिक प्रवाह बदलला. पावसाळ्यात दरवर्षी परिसरातील अनेक गावांना बॅकवॉटरचा फटका बसतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोवरी : राजुरा तालुक्यात बल्लारपूर क्षेत्रांतर्गत वेकोलिच्या भूमीगत व खुल्या कोळसा खाणी आहेत. कोळसा खननासाठी गोवरी, सास्ती, पोवनी, गोयेगाव, अंतरगाव, धोपटाळा व साखरी परिसरात वेकोलिने मातीचे महाकाय ढिगारे नदी व नाल्याच्या किनाऱ्यांवर टाकले. त्यामुळे नैसर्गिक प्रवाह बदलला. पावसाळ्यात दरवर्षी परिसरातील अनेक गावांना बॅकवॉटरचा फटका बसतो. मात्र वेकोलिने अजुनही कायमस्वरूपी उपाययोजना केली नाही.
राजुरा तालुका काळ्या सोन्यासाठी प्रसिद्ध आहे. गोवरी, सास्ती, धोपटाळा, पोवनी, गोयेगाव, अंतरगाव, साखरी परिसरात दगडी कोळशाचे साठे मुबलक प्रमाणात असल्याने वेकोलिने खुल्या खाणी निर्माण केल्या. परंतु, पर्यावरणाचे सर्व नियम धाब्यावर बसविले, असा आरोप परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे दिलेल्या निवेदनातून केला आहे.
मातीचे ढिगारे नदी नाल्याच्या काठावर टाकल्याने नैसर्गिक नाल्याचे पात्र बदलले. पावसाळ्यातील पाणी नाल्या न जाता शेतात शिरते. यातून दरवर्षी मोठे नुकसान होत आहे. वेकोलिने ३० वर्षांपूर्वी गोवरी-सास्ती परिसरात कोळसा खाण सुरू केली. तेव्हापासून हा परिसर डेंजरझोन म्हणून गणल्या जात आहे.
कोळशाचे उत्पादन घेत असताना जिल्हा प्रशासनाकडून वेकोलिला अनेकदा नोटीसा दिल्या. परंतु, शेतकºयांच्या हिताकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे मातीचे ढिगारे कर्दनकाळ ठरले आहेत. पावसाळ्यात गोवरी, सास्ती, पोवनी परिसरातील बहुसंख्य गावांना बॅक वॉटरचा फटका बसतो. शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली येते.
वेकोलिचे हे सारे दुष्परिणाम गावकऱ्यांना सहन करावे लागतात. जल, वायु प्रदूषण वाढले. परंतु वेकोलिने गावकºयांच्या समस्यांवर अद्याप कायमस्वरूपी उपाययोजना केली नाही. यंदा पावसाळ्यात हीच स्थिती राहणार असल्याने शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत.
दरवर्षी सात गावांचे सर्वाधिक नुकसान
वेकोलिने कोळसा खनन करून टाकलेल्या मातीच्या ढिगाºयांमुळे दरवर्षी गोवरी, सास्ती, पोवनी, मानिली, बाबापूर, कढोली, कोलगाव परिसरातील गावांना बॅक वॉटरचा फटका बसतो. त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होते. पिकांची उत्पादकता घटते. पुराच्या पाण्यामुळे शेतीकडे जाणारे रस्ते बंद होतात. अनेक गावांचा संपर्क तुटतो. यंदाही हीच वेळ येऊ शकते.